आमिरच्या औषधांनी डॉक्टरांचं तोंड कडू - Marathi News 24taas.com

आमिरच्या औषधांनी डॉक्टरांचं तोंड कडू

www.24taas.com, नवी दिल्ली
 
'सत्यमेव जयते'द्वारे आमिर खान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. त्याचं केवळ अभिनयापुरतंच मर्यादित न राहाता सामान्य जनतेचे प्रश्न कळकळीने मांडणं लोकांना पसंत पडल्याचं दिसत आहे. मात्र, काही लोक मात्र आमिरच्या या कार्यक्रमाबद्दल नाराज झाले आहेत. नाराज झालेल्या २१ संस्थांची संघटना असलेल्या एका संस्थेने आमिर खानने डॉक्टरांवर केलेल्या आरोपाबाबत माफी मागावी अशी मागणी बुधवारी केली.
 
‘मेडस्केप इंडिया’ नावाच्या संघटनेचे म्हणणे आहे की, आमिरने आपल्या कार्यक्रमातून डॉक्टरांवर भ्रष्ट असण्याचे आणि अनैतिक काम करीत असल्याचा आरोप करणं चुकीचं आहे. यासाठी आमिर खानने माफी मागितली पाहिजे. मेडस्केपचे सहसंस्थापक आणि सल्लागार हिमांशू मेहता यांच्या म्हणण्यानुसार, आमिरने डॉक्टरांवर केलेले आरोप एकतर्फी आहेत.
 
आमिर खानने सत्यमेव जयतेच्या पहिल्या भागात स्त्रीभृण हत्येप्रकरणी समाजाबरोबर डॉक्टर्सनाही दोषी ठरवले होते. नुकत्याच झालेल्या भागात भारतातील आरोग्य सेवेबाबत माहिती देताना औषधे घेताना डॉक्टरांकडून ग्राहकांची कशी फसवणूक केली जाते याबाबत माहिती दिली होती. याच भागात इंडियन मेडिकल कौन्सिलचे प्रमुख डॉक्टर तलवार यांनी हे ही मान्य केले होते, आरोग्य सेवेच्या अनेक प्रकारात स्वतः डॉक्टर्सच भ्रष्टाचार करतात व अडकतात.
 
या गोष्टीवर तीव्र नाराजी व्यक्त करताना मेडस्केपच्या अध्यक्ष आणि डॉक्टर सुनीता दुबे म्हणाल्या, आमिर माझा आवडता अभिनेता आहे. पण त्याने चित्रपटाच्या क्षेत्रापुरतेच मर्यादित रहावे.
 

First Published: Thursday, May 31, 2012, 23:50


comments powered by Disqus