Last Updated: Saturday, December 24, 2011, 09:31
झी २४ तास वेब टीम, कॅनबरा सचिन तेंडुलकर आता म्हातारा झालेला आहे, त्यामुळे त्याच्या बॅटींगची मला भीती नाही अशी दर्पोक्ति जेम्स पॅटिन्सनने केली आहे. पॅटिन्सन हा ऑस्ट्रेलियाचा तरुण फास्ट बॉलर आहे. पॅटिन्सन म्हणाला, “सचिनसमोर बॉलिंग करणं हे खूप आव्हानात्मक असतं, याची मला जाणिव आहे. पण, माझ्या दृष्टीने तो माझ्यासमोर अगदी योग्य वेळी येत आहे. सचिन आता म्हातारा झालेला आहे.”
जेम्स पॅटिन्सनच्या म्हणण्याप्रमाणे खरंच सचिन आता म्हातारा झालेला आहे का? याचं उत्तर कोण देणार? सचिन आपल्या नेहमीच्या शालीनतेला धरून पॅटिन्सनला तोंडी प्रत्युत्तर देणार नाही हे खरं. पॅटिन्सन खरंतर क्रिकेटमध्ये सचिनपेक्षा खूपच नवीन आहे. त्याचं जितकं वय नाही, तितकी सचिनची क्रिकेटमधली कारकीर्द आहे. कदाचित यामुळेच पॅटिन्सनने सचिनला म्हातारं म्हटलं असावं. कदाचित पॅटिन्सनला फक्त सचिनचं वयच माहित असेल. त्याचा खेळ नाही. कारण आज अडोतिसाव्या वर्षी सचिन मैदानावर तरुणांना लाजवेल अशी खेळी करत आहे. उलट, दोन वर्षांपूर्वी वयाच्या छत्तीसाव्या वर्षी सचिनने क्रिकेटमध्ये २०० रन्सचा टप्पा पार करून इतिहास घडवला होता.
सचिनने याच वर्षात ८ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने क शतक आणि ४ अर्धशतकं करत ६५१ रन्स केल्या आहेत. सचिनच्या सरासरी रन्स ४६.५ एवढ्या आहेत. हा सचिनचा अडोतिसाव्या वर्षीचा रेकॉर्ड आहे. त्यातून आता सचिन ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा यापूर्वी अनेकवेळा सचिनने धुव्वा उडवलेला आहे. तेव्हा पॅटिन्सनने ‘म्हाताऱ्या’ सचिनसमोर मैदानात उतरण्यापूर्वी एकदा सचिनचा हा रेकॉर्ड पाठ करून यायला हवं.
First Published: Saturday, December 24, 2011, 09:31