Last Updated: Monday, May 12, 2014, 23:18
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईब्लॉगसारखे नवे माध्यम, ब्लॉगवरील लिखाण पुस्तकरूपाने आणण्याचा नवा प्रयोग, एका तरूण संपादकाने मांडलेले नवे चिंतन आणि नव्या पिढीच्या राजकीय नेत्यांच्या हस्ते प्रकाशन असा नव्याचा संगम `माझं आभाळ` या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने घडून येत आहे. सचिन परब यांच्या ब्लॉगवरील लेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन सुप्रिया सुळे, विनोद तावडे, वर्षा गायकवाड आणि राहुल शेवाळे या सर्वपक्षीय नेत्यांच्या हस्ते मुंबईत होत आहे.
सर्वपक्षीय युवा नेत्यांच्या हस्ते प्रकाशनलोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमधील पुढाऱ्यांमध्ये वादविवादाचे वातावरण आहे. त्याला छेद देत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजपाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, काँग्रेसच्या महिला आणि बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबई महापालिकेतील स्थायी समिती सदस्य राहुल शेवाळे हे नव्या पिढीतील नेते एका व्यासपिठावर येत आहेत. मंगळवार, १३ मे रोजी संध्याकाळी ४.३० वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात होणाऱ्या प्रकाशन कार्यक्रमात हे जुळून आले आहे. `पुढारी`च्या पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे या कार्यक्रमात पुस्तकाविषयी आपले विचार मांडतील.
निवडक चाळीस पोस्टचा समावेश`नवी पिढी नेहमीच्या सामाजिक विचारधारा, राजकीय पक्ष, जातिधर्माचे वाद यामध्ये अडकलेली नाही. त्याच्या पलीकडे जाऊन पठडीबाहेरचं चिंतन `माझं आभाळ` या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे त्याच्या प्रकाशन समारंभात सर्व राजकीय पक्षांच्या नव्या पिढीला एकत्र आणण्याचे औचित्य साधले आहे; असे लेखक आणि `गोवादूत`चे संपादक सचिन परब यांनी सांगितले. परब यांचा सामाजिक आणि राजकीय विषयांवरच्या लेखांचा ब्लॉग मराठी इंटरनेट जगतात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातील निवडक चाळीस पोस्टना या पुस्तकात स्थान देण्यात आले आहे. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. तर प्रसिद्ध चित्रकार सुनील यावलीकर यांनी याच्या मुखपृष्ठासाठी चित्र काढले आहे.
इंटरनेटवर वाचूनही समाधान न होणाऱ्या वाचकांसाठीप्रसिद्ध साहित्यिक, संशोधक आणि मराठीतील एक लोकप्रिय ब्लॉगर संजय सोनावणी यांनी त्यांच्या `पुष्प प्रकाशन`तर्फे या पुस्तकाची निर्मिती केली आहे. `ब्लॉगचे पुस्तक स्वरूपात प्रकाशन हा एक दुर्मीळ योग आहे. कदाचित मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच होत असावा. मला हा ब्लॉ़ग पुस्तकरूपाने आणावासा वाटला कारण यात माणसाला स्वत:कडे डोळसपणे बघायला लावण्याची विलक्षण शक्ती आहे. अजूनही नेटसाक्षर नसणाऱ्या किंवा इंटरनेटवर वाचूनही समाधान न होणाऱ्या वाचकांसाठी हे पुस्तक आणले आहे; ब्लॉग ते पुस्तक या प्रवासाची अशी भूमिका संजय सोनावणी यांनी मांडली.
कार्यक्रमाच्या प्रसंगी २४० पानांचे `माझं आभाळ` हे पुस्तक २०० रूपये या किमतीऐवजी सवलतीत फक्त १०० रूपयांत उपलब्ध असणार आहे. पुण्याच्या भारत बूक हाऊस हे या पुस्तकाचे वितरक आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 12, 2014, 23:18