Last Updated: Saturday, July 7, 2012, 20:45
www.24taas.com, वॉशिंग्टन गेल्या काही दिवसांपासून याहू आणि फेसबूकमध्ये ‘पेटंट’ उल्लंघनासंबंधीत सुरू असलेला खटला अखेर संपवण्याचा निर्णय या दोन्ही कंपन्यांनी घेतलाय. यासाठी त्यांनी पेटंटसंबंधी एक करार करण्याचा निर्णय घेतलाय.
याहूनं मार्च महिन्यात फेसबूकच्या विरुद्ध खटला दाखल केला होता. आपल्या १० ‘पेटंटस्’चं उल्लंघन केल्याचा आरोप याहूनं फेसबूकवर केला होता. तर या विरोधात फेसबूकनं एप्रिल महिन्यात याहूविरुद्ध खटला दाखल केला होता. पण, हा वाद संपवण्यासाठी आता दोन्ही कंपन्यांनी पुढाकार घेतलाय. या करारामध्ये दोन्ही कंपन्यांच्या पार्टनरशीपचा विस्तार केला जाणार आहे. तसंच दोन्ही कंपन्यांच्या जाहिरातीकरणही एकत्रितरित्या होणार आहे. तसंच दोन्ही कंपन्यांच्या काही महत्त्वपूर्ण पेटंटसाठी एकमेकांना निवडक अधिकार दिले जातील.
याहू आणि फेसबूक दोघांच्याही सदस्यांकडून या करारासाठी मंजुरी मिळालीय. पण, याची अधिकृत घोषणा मात्र शुक्रवारी होण्याची शक्यता आहे. या करारानुसार कोणत्याही कंपनीकडून नगदी स्वरूपात देवघेव होणार नाही.
First Published: Saturday, July 7, 2012, 20:45