Last Updated: Saturday, October 1, 2011, 15:06
अण्णा ऑनलाईन येता...
अण्णा हजारे अधिकृतपणे ट्विटर, फेसबुक आणि ब्लॉगवर आले आहेत. आपले सहकारी ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर आणि राजू परूळेकर यांच्या सहकार्याने त्यांनी बुधवारी पहिल्यांदा ट्विटरवर अकाऊंट सुरू केलं, तसंच फेसबुकवर फॅनपेज सुरू केलं... एवढंच नाही तर आपली भूमिका अधिक विस्तृतपणे आणि नेमक्या शब्दात मांडण्यासाठी त्यांनी वर्डप्रेसवर आपला ब्लॉगही सुरू केलाय.
अण्णांच्या ब्लॉगचा यूआरएल आहे...
http://annahazaresays.wordpress.com/ आणि
http://annahazaresays.blogspot.comअण्णांना ट्विटर फॉलो करण्यासाठी यूजर नेम आहे...
annahazaresays आणि फेसबुकवर त्याचं प्रोफाईल ही
Anna Hazare Says याच नावाने आहे...
ट्विटरवर अण्णा सध्या फक्त राजू परूळेकर यांनाच फॉलो करतायत. तर त्यांना फॉलो करणारांचा आकडा फक्त एका दिवसात पोहोचलाय, 998 पर्यंत... आणि त्यांनी फक्त दोन ट्विट टाकलेत. अर्थात हे ट्विट फक्त त्यांच्या नव्या टेकसॅव्ही होण्याविषयीच्या वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्या आहेत.
अण्णांच्या फेसबुक प्रोफाईलवरही आता फक्त दोनच मित्र आहेत. त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट तर खूप आल्या असतील, पण अजून त्यांनी कोणालाच मित्र म्हणून स्विकारलेलं नाहीत. आत्ता त्यांना मिलिंद वेर्लेकर आणि राजू परूळेकर असे दोन मित्र आहेत. फेसबुक प्रोफाईलसाठी असलेली पाच हजार मित्रांची मर्यादा लक्षात घेऊन लवकरच त्याचं फॅनपेज सुरू होण्याची शक्यता आहे.
एरवी अण्णांच्या नावाने शेकडो अकांऊट फेसबुकवर आहेत. पण त्यापैकी एकही खरं नव्हतं, हेही अनेकांना कदाचित ठाऊक नसेल. पण आता अण्णांनी आपल्या ब्लॉगवरूनच खऱ्या अकांऊंटची माहिती दिल्याने अण्णांना सायबर झोनमध्ये फॉलो करणारांना एक दिलासा मिळालाय.
अण्णांच्या दिल्लीतल्या उपोषणाच्यावेळी त्यांना देशभरातून जो उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला, त्यामध्ये प्रामुख्याने तरूणांचाच सर्वाधिक सहभाग होता, आणि त्यातही हा सर्व प्रतिसाद इंटरनेटच्या म्हणजेच सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून मिळाला होता. त्या प्रतिसादाला उत्तर म्हणून अण्णा आता टेकसॅव्ही झाले आहेत. अण्णांनी आपलं फेसबुक अकांऊट सुरू केलंय.
"माझा आवाज प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून या देशातल्या लोकांपर्यंत पोहोचत होता, आता मी ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातूनही माझ्या समर्थकांच्या संपर्कात राहणार आहे" असं त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये स्पष्ट केलंय.
अण्णा हजारेंच्या या ब्लॉगचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते आपले विचार मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा सर्व भाषांमधून व्यक्त करणार आहेत. आता त्यांच्या ब्लॉगवर मराठी आणि इंग्रजी पोस्ट असल्या तरी लवकरच हिंदी पोस्टही येण्याची शक्यता आहे.
"क्रांती ! मोठ्या पल्ल्याची लढाई…" या आपल्या पहिल्याच पोस्टमध्ये मी आपणा सर्वांशी वेळोवेळी या ब्लॉगमधूनच संपर्क साधणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आपल्याला आणखी बरंच लढायचं आहे, संसदेनं ग्वाही दिली म्हणजे कायदा होत नाही, असंही त्यांनी सुरवातीलाच सांगितलंय.
ते पुढे सांगतात,
" दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर मी जेव्हा उपोषणाला बसलो होतो तेव्हापासून सरकारने आणि सत्ताधारी वर्गातल्या काहीं घटकांनी माझ्याबद्दल आणि आंदोलनाबद्दल अनेक अफवा पसरवण्याचे उद्योग केले. जेणेकरून तुमच्या मनात आंदोलनाबद्दल आणि अण्णांबद्दल गैरसमज निर्माण व्हावेत आणि क्रांतीची मशाल पेटत जाण्याअगोदरच विझावी. परंतु त्यांचे प्रयत्न सुदैवाने आणि तुम्हा सार्या भारतीय बांधवांच्या शहाणपणामुळे फोल ठरले. तरीहीं क्रांतीच्या प्रक्रियेत खोडा घालण्याचे काहीं व्यक्तींचे आणि शक्तींचे प्रयत्न सुरूच आहेत आणि यापुढेहीं ते थांबतील असे नाही. माझ्या उपोषण सोडण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत जेव्हा बोलणी होत होती तेव्हा सरकारतर्फे जी माणसे आमच्या टीम मधल्या ज्यांना भेटत होती, त्यातला प्रत्येक माणूस, प्रत्येक मंत्री, प्रत्येक वेळी वेगळे बोलत होता. वेगळे आश्वासन देत होता. शेवटच्या क्षणापर्यंत आंदोलन मोडण्यासाठी असा खेळ चालू होता. सरकारतर्फे वाटाघाटी करण्यासाठी माझ्यापर्यंत जी माणसे येत होती आणि आली त्यातली कोण स्वच्छ चारित्र्याची होती आणि कोण भ्रष्ट होती याची शहानिशा सरकारने करायला हवी होती. मी त्यांच्याशी चर्चा केली ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून. स्वच्छ माणसे कुठून आणणार असा प्रश्न सरकारला पडला होता का, हे सरकारलाच माहित. माझ्या दृष्टीने ती माणसे मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी. ती काहीं चळवळीवर उपकार करायला आली नव्हती ! त्या व्यक्ती, ते नेते सरकारकडून निरोप घेऊन येत होते. आमच्याकडून निरोप घेऊन जात होते. सर्वात शेवटी मी उपोषण सोडले ते माझ्या आतल्या आवाजावर विश्वास ठेवून आणि सरकारकडून ठोस आश्वासन आल्यावरच ! हे मी इथे लिहित आहे कारण आपणच सगळे काहीं घडवून आणले असा आभास आणि प्रचार काहीं मध्यस्थ म्हणवून घेणार्यांनी त्यांच्या लाडक्या मंत्री-महोदयांना श्रेय देण्यासह केल्याचे माझ्या निदर्शनास आणण्यात आले आहे. स्वतःचे गोडवे गाणारे लेख, मुलाखती त्यांनी प्रसिध्द केल्या. परंतु तो सगळा धादांत खोटा प्रचार आहे. सत्याच्या लढाईत आजवर मी कधीच मनाला न पटणारे निर्णय घेतलेले नाहीत. आपणच आंदोलन मिटविल्याचा दावा करणारे भारतीय जनतेच्या आणि स्वातंत्र्याच्या दुसर्या लढाईच्या विरोधात काम करीत आहेत, असे म्हणावे लागेल. भ्रष्टाचारविरोधी लढा संपविण्यासाठी भ्रष्टाचाराचाच अवलंब करण्याचा प्रयत्न काहीं मंडळी करीत आहेत असे यातून दिसत आहे. हा धोका लक्ष्यात घेऊन आपणा सर्वांना सदैव सावध रहावे लागेल."आपलं उपोषण गुंडाळण्यासाठी सरकारच्या वतीने कसे प्रयत्न केले जात होते, याची माहितीही त्यांनी विस्तृतपणे दिलीय. शिवाय लवकरच आपण संपूर्ण देशाचा दौरा करणार असून या सर्वकाळात या ब्लॉगवरूनच माझे अधिकृत विचार प्रसारित होतील, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
First Published: Saturday, October 1, 2011, 15:06