भविष्यात २२ कोटी आकाश टॅबलेटची गरज - Marathi News 24taas.com

भविष्यात २२ कोटी आकाश टॅबलेटची गरज

www.24taas.com, मुंबई
 
जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट आकाशच्या २२ कोटी युनिटची गरज भासेल असं सरकारने म्हटलं आहे. शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञानाचा मेळ घालण्यासाठी आकाश टॅब उपयुक्त ठरणार आहे.
 
सुरवातीला आकाशच्या एक लाख टॅबलेट विकत घेतल्या असल्या तरी येत्या काही वर्षात २२ कोटी टॅबलेटची गरज भासेल असं मनुष्य बळ विकास खात्याचे अतिरिक्त सचिव एन.के.सिन्हा म्हणाले. आकाश टॅबलेटच्या मोठ्या प्रमाणावर निर्मितीसाठी परत एकदा निविदा मागवण्यात येणार असल्याचं तसंच आकाशची निर्माती असलेल्या डाटाविंडसह इतर कंपन्यांनाही निविदा प्रक्रियेत सहभागाची संधी मिळेल.
 
आकाश टॅबलेटसाठी अमेरिका आणि आफ्रिकन राष्ट्रांमधूनही विचारणा होत असल्याचं या अधिकाऱ्याने सांगितलं. निविदा प्रक्रियेसाठी तयारी सुरु असल्याचंही ते म्हणाले. आकाशच्या दर्जा संबंधी तसंच प्रोसेसरची गती, बॅटरी आदी तांत्रिक बाबीं संदर्भात तक्रारींविषयी चौकशी करण्यात येत असल्याचं सिन्हा यांनी सांगितलं. आकाशसाठी अमेरिका, पनामा, इक्वेडोर आणि इतर आफ्रिकन राष्ट्रांमधून विचारणा होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
आकाशमध्ये सात इंच टच स्क्रिन तसंच एआरएम ११ प्रोसेसर आणि २५६ एमबी रॅम आणि एण्ड्रोईड २.२ ऑपरेटिंग सिस्टिम ही फिचर्स आहेत. आकाशचे अपग्रेडेड वर्जन युबीस्लेट 7 + जानेवारी अखेरीस बाजारात उपलब्ध होणार आहे. मनुष्य बळ विकास मंत्रालयाच्या शिक्षण राष्ट्रीय अभियाना अंतर्गत असलेल्या एनएमइ-आयसीटी प्रकल्पा अंतर्गत सरकारी सबसिडी दिल्यानंतर विद्यार्थ्यांना अवघ्या ११०० रुपयात आकाश उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
 
 

First Published: Monday, January 16, 2012, 16:20


comments powered by Disqus