Last Updated: Tuesday, April 3, 2012, 14:06
www.24taas.com, कोलकाता आकाश टॅबलेटचं नवं व्हर्जन मे महिन्यात सादर करण्यात येणार असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी सोमवारी सांगितलं. ‘इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स’ने (आयसीसी) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना कपिल सिब्बल म्हणाले की, आकाशचं नवं व्हर्जन अधिक चांगलं असेल. याचा प्रोसेसर ७०० मेगावॅट असेल. या टॅबलेटची बॅटरी अथक ३ तास चालू शकेल. असं ‘आकाश’चं अत्याधुनिक व्हर्जन मे महिन्यात जनतेसाठी उपलब्ध होईल.
या वेळी सिब्बल म्हणाले, आकाशच्या नव्या व्हर्जनचं काम दोन प्रौद्योगिक कंपन्यांना देण्यात आलंय. या आधी डेटाविंड नामक कंपनी आकाश टॅबलेट बनवणार होती. मात्र, या कंपनीकडून वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे आता ‘आकाश’ बनवण्याचं काम दुसऱ्या कंपन्यांकडे दिलं गेलं आहे.
डेटाविंड कंपनीने बनवलेल्या आकाश टॅबलेटमध्ये अनेक त्रुटी होत्या. त्यामुळे सरकार या कंपनीने बनवलेल्या टॅबलेट्सवर नाखूश होती. आकाश टॅबलेट कोणताही व्यवसायिक फायदा न पाहाता विकण्यात येणार आहे. आकाशच्या बनवण्यात आलेल्या नव्या व्हर्जनची सध्या चाचणी घेण्यात येत आहे. एकदा या आकाश-२ ला मंजूरी मिळाली, की जगातील सर्वांत स्वस्त असणारं हे टॅबलेट सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे
First Published: Tuesday, April 3, 2012, 14:06