Last Updated: Thursday, December 6, 2012, 13:41
www.24taas.com, रत्नागिरी बाबासाहेबांच्या नावानं राजकारण करणाऱ्यांची चढाओढ लागलीय. कोट्यवधी पददलितांचा उद्धार करणाऱ्या महामानवाचं मूळ गाव मात्र विकासांपासून कोसो दूर राहिलंय. आंबेडकरांच्या स्मारकाकडेही कुणाला लक्ष द्यायला वेळ नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातलं अंबावडे गाव... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं हे मूळगाव... बाबासाहेबांच्या आठवणी या गावानं त्यांच्या स्मारकाच्या रुपानं जपून ठेवल्यात. बाबासाहेबांचा अस्थिकलश आणून गावकऱ्यांनी त्यांचं स्मारक उभारलंय. आंबेडकरी जनतेसाठी आंबवडे गावातलं हे स्मारक तिर्थस्थळ झालंय. लोकप्रतिनिधी आणि सरकारला मात्र या स्मारकाचा विसर पडलाय. गावकरी स्वतःच्या खर्चातून या स्मारकाची देखभाल करत आहेत.
आंबेडकरांच्या नावानं अनेक राजकीय पक्ष मतांचा जोगवा मागताना दिसतात. मात्र, आंबेडकरांचं मूळ गाव आणि विकास यांचा संबंध मात्र अजूनही आलेला नाही. ज्यानं दलित पददलितांच्या उद्धारासाठी आयुष्य खर्ची घातलं, त्या महामानवाच्या गावाच्या आणि स्मारकाच्या विकासाकडं मात्र सोईस्कररित्या दुर्लक्ष केलं जातंय, हे दुर्देवं म्हणावं लागेल.
First Published: Thursday, December 6, 2012, 13:41