Last Updated: Friday, June 28, 2013, 11:47
www.24taas.com,झी मीडिया, नवी मुंबई
कुख्यात गँगस्टर अबू सालेमवर गोळीबार करण्यात आलाय़. यात तो जखमी झालाय. त्याच्या करंगळीला गोळी चाटून गेलीय. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या हल्ल्यानंत नवीमुंबईतील तळोजा जेलची सुरक्षा धोक्यात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.
गँगस्टर संतोष शेट्टी टोळीचा गुंड देवेंद्र जगताप यानं सालेमवर गोळी झाडली. जगताप हा शाहीद आझमी यांच्या खुनाच्या गुन्ह्याखाली अटकेत आहे. काही आठवड्यापूर्वी खंडणीच्या रकमेवरून सालेम आणि जगतापमध्ये बाचाबाची झाली होती.
कुख्यात गँगस्टर छोटा राजनच्या टोळीत काम करतानाही सालेम आणि जगतापमध्ये संबंध ताणले गेले होते. त्यानंतर सालेमनं स्वत:ची टोळी बनवली तर जगताप संतोष शेट्टी, विजय शेट्टी आणि भरत नेपाळीच्या टोळीत सामील झाला होता. त्यानंतर तो नेपाळी आणि शेट्टीसाठी काम करू लागला. या दोघांच्या सांगण्यावरूनच जगतापनं वकील शाहीद आझमी यांची सुपारी घेतली होती. त्यांच्याच खुनाच्या आरोपाखाली जगताप सध्या अटकेत आहे.
यापूर्वीही आर्थर रोड जेलमध्ये अबू सालेमवर हल्ला झाला होता. गँगस्टर मुस्तफा डोसानं त्याच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर सालेमला तळोजा जेलमध्ये हलवण्यात आलं होतं. सालेमवरील या हल्ल्याचे कारण अद्याप समजलं नाही.. याबाबत नवी मुंबई पोलिसांनी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.
जेलची सुरक्षा धोक्यात? तळोजा जेल अधिकारी भास्कर कचरे यांच्यावर ऑक्टोबर २०१२ मध्ये प्राणघातक हल्ला झाला होता. त्यांच्या हत्येची सुपारी जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड विकी देशमुख याने दिली असल्याचे समोर आले होते. हल्ला करण्याच्या वेळी देशमुख हा जेलमधून त्यांच्या मोबाइलच्या माध्यमातून बाहेर संपर्कात होता. जेलची सुरक्षा भेदून मोबाइल त्याच्यापर्यंत पोहोचलाच कसा, याचा शोध लागलेला नाही.
गँगस्टर आबू सालेम याच्यावर भरत नेपाळीचा हस्तक आणि जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला देवेंद्र जगताप याने फॅक्टरीमेड रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. ही रिव्हॉल्व्हर आत गेलीच कशी, असा सवाल उपस्थित होतो.
अबू सालेमचाच हात? गँगस्टर अबू सालेमवर देवेंद्र जगताप या आरोपीने गोळी झाडली खरी, मात्र ती कोणाच्या इशार्याववरून हा नवी मुंबई पोलिसांसह मुंबई गुन्हे शाखेच्या तपासाचा विषय आहे. मात्र, यात अबूचाच हात असल्याची कुजबूज पोलीस वर्तुळात सुरू आहे. त्याबाबत हा हल्ला वैयक्तिक दुश्मनीतून नाही तर कोणाच्या तरी इशार्यातवरून केला असावा, असा अंदाज मुंबई गुन्हे शाखेतल्या अधिकार्यांहनी व्यक्त केला. त्याआधी आर्थर रोड कारागृहात सालेमवर मुंबई बॉमबस्फोट खटल्यातील आरोपी आणि डॉन दाऊद इब्राहिमचा अत्यंत जवळचा साथीदार मुस्तफा डोसाने हल्ला केला होता.
हल्ल्याचा सालेमवरच आरोप करण्यात येत आहे. बनावट पासपोर्ट प्रकरणी २००५ मध्ये पोतरुगालमध्ये सालेमला अटक झाली. मुंबई बॉम्बस्फोटांसह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सालेम सीबीआय, मुंबई गुन्हे शाखेस, अन्य यंत्रणांना हवा होता. अनेक अर्ज-विनंत्यांनंतर पोतरुगालने सालेमला भारताच्या ताब्यात दिले. मात्र, त्या वेळी सालेमच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, त्याला फाशीची शिक्षा देऊ नये, अशा अटी घातल्या होत्या. या अटींचा भंग झाल्यास सालेमला पुन्हा ताब्यात घेऊ, अशी अट पोतरुगालने घातली होती. हाच आधार घेऊन सालेमने जेडीकरवी स्वत:वर हल्ला करवून घेतला असावा, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
First Published: Friday, June 28, 2013, 11:47