Last Updated: Thursday, January 23, 2014, 11:27
www.24taas..com, झी मीडिया, ठाणेदोन दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात अचानक पडलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. तर डोंबिवलीत चक्क हिरवा पाऊस पडला. डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात मंगळवारी झालेल्या हिरव्या पावसाच्या चौकशीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने विशेष पथकाची नियुक्ती केली आहे.
या पथकातील प्रदूषण मंडळाच्या टेक्निकल विभागाचे असिस्टंट सेक्रेटरी पी. के. मिराशी आणि मुख्य सहाय्यक अधिकारी डॉ. अमर सुपाते यांनी बुधवारी या परिसराची पाच तास पाहाणी केली. परिसरातील झाडांची पाने, मातीचे नमुने गोळा केले, नागरिकांच्या प्रतिक्रियाही घेतल्या. हा हिरवा पाऊन नाही तर तो पावसाच्या पाण्यात मिसळलेला रंगच असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र हे सर्व नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून तीन-चार दिवसांत कारण समजू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
डोंबिवली आणि परिसरात हिरवा पाऊस पडताच हंगामा झाला. हे प्रदूषण नसून कंपन्यातील रंग बाहेर नेताना रस्त्यात पडला असून त्यावर पाणी पडल्यामुळे त्याचे अस्तित्व उघड झाले असावे, असा काही अधिकाऱ्यांनी निष्कर्ष काढला. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. डोंबिवली शहरात कायमच प्रदूषणाचा त्रास होत असतानाही प्रदूषण मंडळाकडून प्रदूषण आटोक्यात असल्याचा दावा केला गेल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. आमच्या आरोग्याशी हे अधिकारी खेळत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.
हिरवा पाऊस हवेतील फ्लोरोसीनमुळे
एमआयडीसी परिसरातील डाय बनविणाऱ्या कंपन्यांमधून बाहेर पडलेल्या फ्लोरोसीनचा हवेतील पाण्याशी संपर्क झाल्यामुळेच जमिनीवर पडलेले पाणी हिरव्या रंगाचे झाले, असा निष्कर्ष पर्यावरण तज्ज्ञ निवृत्त प्राचार्य सूर्यकांत येरागी यांनी काढला आहे. पर्यावरणात पसरणाऱ्या घातक रसायनांचा अंदाज यावरून सहज येऊ शकतो, कोणत्याही केमिकलचा मनुष्याच्या शरीरावर घातक परिणाम होत असतो म्हणूनच हे प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 23, 2014, 11:27