Last Updated: Tuesday, November 26, 2013, 23:25
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई / सिंधुदुर्ग सिंधुदुर्गातल्या राड्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी एकमेकांना आव्हान - प्रतिआव्हान दिलंय. नारायण राणेंचं राजकीय थडगं बांधण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी कोकणी जनतेला केलं होतं त्याला प्रत्युत्तरादाखल ‘…आधी साहेबांचं स्मारक बांधा मग थडगं बांधा’ असा टोला राणेंनी उद्धवला लगावलाय. ‘धमक्या दिल्यात तर सिंधुदुर्गातून गाड्या परत येऊ देणार नाही’ असाही सज्जड दम राणेंनी भरलाय.
कणकवलीत तणावग्रस्त वातावरण सिंधुदुर्गात शिवसैनिक विरूद्ध नारायण राणे समर्थक असा राडा पेटला असताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही या आगीत तेल ओतलं. शिवसैनिकांवर सुपारी घेऊन जबर लाठीमार करणाऱ्या पोलिसांची आणि सत्ताधाऱ्यांची दादागिरी खपवून घेणार नाही, असा दम उद्धव ठाकरेंनी दिलाय. त्यालाच नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलंय.
गेल्या रविवारी कणकवलीत शिवसैनिकांना पोलिसांनी बेदम चोप दिला होता. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आयोजित आमने-सामने कार्यक्रम पोलिसांनी रद्द केल्याने, संतप्त शिवसैनिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तेव्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी लाठीमाराचा आदेश दिला आणि पोलिसांनी शिवसैनिकांना अक्षरशः चोपून काढलं. शिवाय जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्यासह अनेक शिवसैनिकांना अटक केली. त्यामुळे सिंधुदुर्गातील वातावरण चिघळलंय. गेल्या दोन दिवसांपासून कणकवलीमध्ये बंदसदृश तणाव आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी स्वतः कणकवलीत जाऊन जखमी शिवसैनिकांची विचारपूस केली. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जखमी शिवसैनिकांना भेटून उद्धव यांनी त्यांना धीर दिला. त्यानंतर कणकवलीत झालेल्या छोटेखानी सभेत आणि पत्रकार परिषदेत उद्धव यांनी नारायण राणे आणि सरकारवर जोरदार `प्रहार` केले. नारायण राणेंची सुपारी घेऊन शिवसैनिकांना मारहाण करणाऱ्या एसपी त्रिमुखे यांची बदली करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलीय. नारायण राणे यांच्यासह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर. आर. पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही उद्धव यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं.
सिंधुदुर्गात नारायण राणे विरूद्ध शिवसैनिक असे राडे काही नवे नाहीत. यापूर्वी परशुराम उपरकर शिवसेनेत असताना, शिवसैनिकांनी वेंगुर्ल्यामध्ये राणेंचे पुत्र नितेश राणे यांना पक्ष कार्यालयात कोंडून ठेवले होते. त्यावेळीही पोलिसांनी शिवसैनिकांना चोपले होते. उद्धव ठाकरे तेव्हा मात्र सिंधुदुर्गात गेले नव्हते. परंतु रविवारच्या राड्यानंतर मात्र उद्धव ठाकरे फौजफाट्यासह राणेंच्या बालेकिल्ल्यात दाखल झाले. निवडणुकांच्या तोंडावर नारायण राणे यांच्या विरोधात वातावरण तापवण्यासाठी शिवसेना नेतृत्व या राड्याचे भांडवल तर करत नाही ना, अशी शंका यानिमित्ताने निर्माण झालीय.
व्हिडिओ पाहा - •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, November 26, 2013, 18:16