शहिदाच्या मात्या-पित्याची वणवण - Marathi News 24taas.com

शहिदाच्या मात्या-पित्याची वणवण

www.24taas.com, भारत गोरेगावकर, रायगड
 
रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूरमध्ये राहणाऱ्या वीर माता-पित्याच्या नशिबी उपेक्षितांचं जगणं आलंय. एकुलता एक मुलगा शहीद झाला, तेव्हा वीरमरण आलेल्या मुलाचं स्मारक बांधण्यापासून घरापर्यंत पक्का रस्ता बांधण्याची मोठ-मोठी आश्वासनं नेत्यांकडून देण्यात आली. प्रत्यक्षात वृद्ध माता-पित्यांना घरी जाण्यासाठी पायवाटही उरलेली नाही.
 
‘राकेश तात्याबा सावंत’ हा वीर जवान वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी देशाचं रक्षण करताना 2009 मध्ये शहीद झाला. पोलादपुरात त्याच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या गावातल्या जवानाला वीरमरण आलं म्हणून राकेशला निरोप द्यायला पंचक्रोशीतली जनता पोलादपुरात लोटली होती.
 
 
गर्दी दिसली की भाषणं ठोकणाऱ्या नेत्यांनी राकेशचं स्मारक बांधण्यापासून ते घरापर्यंत पक्का रस्ता बांधण्यापर्यंत अनेक आश्वासनं दिली. दिवस गेले, महिने झाले, वर्षं लोटली तसा सर्वांनाच आश्वासनांचा विसर पडला. अखेर राकेशच्या वृद्ध मातापित्यांनीच स्वखर्चानं घरासमोर त्याचं स्मारक बांधलं. आता मिळालेल्या आश्वासनानुसार रस्ता तरी बांधून मिळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. पण, त्यांच्या घरापर्यंत जाणारी पायवाटही बंद करण्यात आलीय.
 
रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यानं आजपर्यंत 14 शहीद देशाला दिलेत. पण, एकाही शहिदाच्या कुटुंबीयांकडे लक्ष द्यायला प्रशासनाला वेळ मिळाला नाही. स्मारक तर आम्ही बांधलं, तिथं जायला किमान रस्ता तरी द्या, एवढीच काय ती राकेशच्या वृद्ध आई-वडिलांची माफक अपेक्षा आहे.

First Published: Friday, May 18, 2012, 16:24


comments powered by Disqus