Last Updated: Friday, May 18, 2012, 19:09
www.24taas.com, ठाणे ठाण्यातील ‘श्रीष’ गृहनिर्माण संस्थेतील काही बंगल्यांच्या पुनर्बांधणीच्या कामावरुन संस्था आणि बिल्डर यांच्यात वाद सुरु आहे. या वादात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या आग्रहावरुन मुख्यमंत्र्यांनी पुनर्बाँधणीच्या कामाला स्थगिती आदेश दिलाय. पण आता मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचा आदेश नगरविकास खात्याला दिलाय.
ठाण्यातल्या ‘श्रीष’ गृहनिर्माण संस्थेतील जुन्या छोट्या बंगल्यांची पुनर्बांधणी होणार होती. पण या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी बिल्डरच्या हेतूविषयी शंका घेत पुर्नबांधणीचा करार रद्द केला. काही काळानं बिल्डरनं विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना गाठलं आणि मग खडसे यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांनाच या प्रकरणी बिल्डरच्या बाजूनं निर्णय देण्यास भाग पाडले. सोसायटीच्या पुनर्बांधणीच्या कामाला स्थगिती देण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यानं काढला. पण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे धाव घेऊन त्यांना विरोधी पक्षनेते आणि बिल्डरच्या हातमिळवणीची माहिती दिली.
‘श्रीष’च्या निमित्तानं बिल्डर, विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्र्यांचा दोस्ताना चव्हाट्यावर आला. राजकारणी आणि बिल्डरांचं नेक्सस मोडून काढण्याची भाषा करणाऱ्या मुख्यमत्र्यांवरच चहूबाजुंनी टीकेचा भडीमार झाला. अखेर नामुष्की ओढवलेल्या मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून तातडीनं अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
व्हिडिओ पाहा :
First Published: Friday, May 18, 2012, 19:09