'पंतप्रधानांवर विश्वास नाही', अण्णांचा उद्वेग - Marathi News 24taas.com

'पंतप्रधानांवर विश्वास नाही', अण्णांचा उद्वेग

www.24taas.com, रत्नागिरी
 
भ्रष्टाचार संपवण्यासाठी केंद्र सरकारकडून पुरेसे प्रयत्न होत नसल्यामुळे दुःखी झालेल्या अण्णा हजारेंनी आपला आता पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. सध्या अण्णांचा दौरा रत्नागिरी येथे चालू आहे.
 
“पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर माझा पूर्ण विश्वास होता. पण, आता माझा त्यांच्यावरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. आता आपल्याला चांगलं चरित्र असणाऱ्या लोकांनाच निवडून संसदेत बसवलं पाहिजे. असं केलं तरच देशाला अपेक्षित असणारा बदल घडेल.”असं अण्णा म्हणाले. तसंच, गेल्या ६५ वर्षांत संसदेत लोकहितार्थ एकही कायदा केला गेला नसल्याबद्दल दुःख व्यक्त केलं.
 
बहुतेक सर्व निधी हा नेते आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामध्येच निघून जातो असा आरोपही अण्णांनी केला. यातील केवळ १०% संपत्तीच देशाच्या विकासासाठी वापरली जात आहे. अशा परिस्थितीत आपण राष्ट्रीय विकासाची अपेक्षा कशी करणार? असा सवालही अण्णांनी केला आहे. सक्षम लोकपाल बिलासाठी अण्णा सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत.
 

First Published: Friday, June 1, 2012, 16:51


comments powered by Disqus