डावखरेंची बाजी, २० वर्षांच्या सत्तेला हादरा - Marathi News 24taas.com

डावखरेंची बाजी, २० वर्षांच्या सत्तेला हादरा

www.24taas.com, नवी मुंबई
 
कोकण पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे  यांनी मोठ्या फरकांनी भाजप-शिवसेनेचे उमेदवार संजय केळकर यांना पराभूत केले. युतीची गेल्या वीस वर्षांपासूनची मक्तेदारी मोडून काढली आहे.
 
सर्वात धक्‍कादायक निकाल म्‍हणजे कोकणातून वसंत डावखरे यांचे चिरंजीव निरंजन यांचा विजय झाला आहे. भाजपचे संजय केळकर यांचा त्‍यांनी अटीतटीच्‍या लढतीत पराभव केला.  भाजपसाठी हा फार मोठा धक्‍का आहे.
 
कोकण पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादीतून बंडखोरी झाली होती. तसेच मनसेचा उमेदवारही रिंगणात होता. त्यामुळे कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती. डावखरे यांना २७७३३  तर संजय केळकर यांना २२०९२ मते पडलीत. डावखरे यांनी ५६४१ मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमध्ये जल्लोषाचे वातावरण होते.
 
कपिल पाटील विजयी
तर मुंबईत शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील विजयी झाले आहेत. मनिषा कायंदे यांचा मोठ्या फरकाने त्‍यांनी पराभव केला आहे. कायंदे यांच्‍या बंडखोरीमुळे शिवसेना-भाजपमध्‍ये तणाव निर्माण झाला होता. कपिल पाटील यांना ९७४९ मते मिळाली तर मनिषा कायंदे यांना केवळ ६३१ मते मिळाली. अपक्ष उमेदवार बाळासाहेब म्हात्रे यांना १५२९ मते मिळाली.
 
 शिवसेनेचे दीपक सावंत विजयी
पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे दीपक सावंत विजयी झाले आहेत. त्‍यांचा विजय निश्चितच मानला जात होता. दीपक सावंत यांनी राष्ट्रवादीचे राजेश टेके यांचा पराभव केला. दीपक सावंत यांना १४०४२ मते मिळाली तर टेके यांना १२९८ मते मिळाली आहेत.

First Published: Wednesday, July 4, 2012, 18:37


comments powered by Disqus