Last Updated: Friday, July 20, 2012, 18:43
www.24taas.com, रत्नागिरी कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने याचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. विलवडे ते वैभवाडी दरम्यान सायंकाळी ४.३० वाजता कोकण रेल्वे रूळावर दरड कोसळ्याने कोकण रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. वैभवाडीत जनशताब्दी थांबून ठेवण्यात आली आहे. रूळावरील माती हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
गेला आठवडा कोकणात संततधार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा कहर झाला आहे. या पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला. कोदवली आणि अर्जुना नदीला पूर आल्याने राजापूर बाजारपेठेत पाणी घुसले आहे. खेडमधील नारंगी, जगबुडी, संगमेश्वरमध्ये शास्त्रीनदी दुथडी वाहत आहे. तसेच सिंधुदुर्गातही पावसाचा जोर कायम आहे.
कोसळत असलेल्या पावचा तडाखा कोकण रेल्वेला बसला. लांजाजवळील विलवडे याठिकाणी दडर कोसळ्याने मातीचा ठिगारा साचला आहे. त्यामुळे रेल्वेरूळ माती खाली गेल्याने रेल्वे वाहतूक ठप्प पडली आहे. सायंकाळी मुंबईकडे जाणारी मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस सिंधुदुर्गातील वैभवाडी स्थानकात थांबविण्यात आली आहे. ही गाडी दोनतास स्थानकात उभी आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला असून प्रवासी ताटकळले आहेत.
रूळावरील माती हटविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. एकतास माती हटविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक दोन तासानंतर सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, पावसाचा व्यत्यय कामात येत आहे. त्यामुळे रेल्वेवाहतूक नेमकी कधी सुरू होईल, याची माहिती देण्यात आलेली नाही.
First Published: Friday, July 20, 2012, 18:43