सरकारी काम, आणि बारा महिने थांब - Marathi News 24taas.com

सरकारी काम, आणि बारा महिने थांब

www.24taas.com, कल्याण
 
प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका आज अनेकांना बसतो आहे याचं उत्तम उदाहरण आहे कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात एमएमआरडीए आणि पालिका प्र्शासनाच्या वतीनं बांधण्यात येत असणारा उड्डाणपूल. हा उड्डाणपूल १२ महिन्यात पूर्ण होणार होता. मात्र अडीच वर्षांनंतरही तो पूर्ण करण्यात प्रशासनाला अपयश आलं आहे. त्यामुळे याठिकाणी अपघातांचं प्रमाण वाढलं आहे.
 
कल्याण पूर्वेकडील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीए आणि पालिका प्रशासनाने कोळसेवाडी परिसरात उड्डाणपूल बांधण्याचं ठरवलं पण १२ महिन्यात पूर्ण होणारा उड्डाणपूल अडीच वर्ष उलटले तरी पूर्ण झाला नाही आणि त्यामुळे वाहतूकीला अडचणी येणे, अपघात होण्याचे प्रकार इथं वाढले आहेत. बुधवारी असाच एक मोठा अपघात झाला. जेसीबीने एका रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षातून प्रवास करणाऱ्या राय दुबे जागीच मरण पावला तर अन्य प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
 
याप्रकरणी स्थानिक नगरसेवकाला विचारलं असता त्यांनीही त्या पुलाचं काम रखडलं असल्याचं मान्य केलं. जे काम १२ महिन्यात पूर्ण होणार होतं ते अडीच वर्षातही पूर्ण होत नसेल तर आता प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर बोटं मोडावीत का आणि त्याचा फटका निष्पापांनी का सहन करायचा अशी चर्चा कल्याणमध्ये रंगते आहे.
 
 
 

First Published: Thursday, February 23, 2012, 08:30


comments powered by Disqus