Last Updated: Monday, November 7, 2011, 12:55
झी २४ तास वेब टीम, लांजा राणे यांच्या ठोकशाहीचा भास्कर जाधवांना चांगलाच प्रत्यय आला आहे. राणे यांच्यावर टिका केल्यानंतर भास्कर जाधवांचे कार्यालय फोडण्यात आले. यानंतर या वादाला हिंसक वळण लागले. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्तेसुद्धा रस्त्यावर उतरले, आणि चिपळूणमध्ये मुंबई-गोवा महामार्ग रोखण्यात आला.

कोकणात निवडणुकीआधी राजकीय धूमशान सुरु झालं. उद्योगमंत्री नारायण राणे आणि राज्यमंत्री भास्कर जाधव या सत्ताधारी नेत्यांमधला सघर्ष मुद्यांवरून गुद्यावर आला. राणे समर्थकांनी जाधव यांचं चिपळूणातलं संपर्क कार्यालयावर हल्ला चढवत या संघर्षाला हिंसक रुप दिलं. गेले काही दिवस टीका आणि आरोपांनी गाजत असलेला वाद आज हल्ला होण्यापर्यंत वाढला. चिपळूणात हल्ला होताच राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले. मुंबई-गोवा महामार्ग रोखून त्यांनी जाधव यांच्या कार्यालयावरील हल्ल्याचा निषेध केला आणि हल्लेखोरांना तातडीनं अटक करण्याची मागणी केली. खासदार नीलेश राणेंनी रत्नागिरीत जाधवांवर टीकास्त्र सोडल्यानंतर काही वेळातच चिपळूणात जाधवांच्या कार्यालयावर हल्ला झाला. तिकडे लांज्यातही राणे समर्थकांनी जाधवांचा पुतळा जाळला.
सिंधुदूर्ग जिल्ह्यात राणेंच्या कार्यपध्दतीविरोधात आमदार विजय सावंत यांनी जुन्या कार्यकर्त्यांची मोट बांधून मेळावा घेतला. यावेळी जुन्या काँग्रेसमधील कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा पाढा वाचला. जुने काँग्रेसवाले आक्रमक झाल्यानंतर नारायण राणेंनीही या संघर्षात आवाज दिला. माझ्याविरोधात पक्षातीलच काही लोक आमदार विजय सावंत यांच्या माध्यमातून अपप्रचार करत असून यापुढं असे वर्तन खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष अधिकच धारदार होण्याची चिन्हे आहेत.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचे पडघम वाजू लागलेत आणि सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये मात्र गटातटांचा संघर्ष शिगेला पाहोचला असताना तिकडे उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला वालीच नाही, अशी स्थिती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट पक्षाच्या मेळाव्यातच कथन केली. त्यामुळे अन्य पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले असताना काँग्रेससमोर मात्र पक्षातल्या लाथाळ्या संपवण्याचं आव्हान आहे. सिंधुदुर्गात आमदार विजय सावंत आणि माजी आमदार पुष्पसेन सावंत या जुन्या काँग्रेस नेत्यांनी मेळावा घेऊन नारायण राणे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. त्यामुळे खवळलेल्या राणेंनी विजय सावंत यांचा बोलवता धनी वेगळा असून राज्यातल्या नेत्याच्या सांगण्यावरून हे राजकारण करत असल्याचा आरोप केला. अर्थात असले प्रकार खपवून घेणार नाही असा सज्जड दमही राणेंनी पक्षांतर्गत विरोधकांना भरला.
First Published: Monday, November 7, 2011, 12:55