५० लाख झाडांची तोड, शासनाला पत्ताच नाही - Marathi News 24taas.com

५० लाख झाडांची तोड, शासनाला पत्ताच नाही

www.24taas.com, ठाणे
 
ठाणे जिल्ह्यात गेल्या 12 वर्षात 50 लाखांपेक्षा अधिक वृक्षांची अनिधिकृतपणे तोड आणि तस्करी झाल्याचं उघड झालं आहे. महसूल खात्यातील तहसीलदार श्रेणीचे अधिकार परस्पर वापरून आणि आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन पर्यावरणाचं अनोनात नुकसान झाल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे.
 
वाडा या आदिवासी भागात राहणारे अजय जामसंडेकर गेली चार वर्षं ठाणे जिल्ह्यातल्या लाकडांच्या तस्करीविरुद्ध लढा देत आहे. त्यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार शहापूर विभागाकडून गेल्या 12 वर्षात जवळपास 5 लाख झाडं तोडल्याचं स्पष्ट झालं आहे.
 
जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, वसई-पालघर अशा सर्व ठिकाणी मिळून 50 लाखांपेक्षा अधिक झाडांची कत्तल झाल्याचा त्यांचा अंदाज आहे. 16 प्रकारची ठराविक झाडं सोडली, तर इतर झाडं तोडण्यासाठी तहसीलदाराची परवानगी घ्यावी लागते. मात्र गेल्या 12 वर्षांत अशी एकही परवानगी दिली गेली नसल्याचा दावा कलेक्टर ऑफिसमधून कऱण्यात येतो आहे.
 
वनविभागातर्फे आदिवासींना जंगलात देण्यात येणाऱ्या एकसाली प्लॉटमधील वृक्षांचीही तोड आणि तस्करी सुरु आहे. आदिवासींना 100 ते 200 रुपयांचं अमिष दाखवत सुमारे 8 ते 10 हजार किंमतीच्या झाडांची तस्करी केली जाते. या कोट्यवधींच्या घोटाळ्याविरोधात 26 मार्चपासून उपोषणाला बसण्याचा निर्णय जामसंडेकर यांनी घेतला आहे.
 
फर्निचर, कात तसंच रंग बनवण्यासाठी सागाची आणि खैराची झाडं तोडली जातात. हा भ्रष्टाचार वेळीच थांबला नाही, तर पर्यावरणाची ही हानी भरून यायला पुढच्या कित्येक पिढ्यांना वाट पाहावी लागणार आहे.
 
 

First Published: Monday, March 19, 2012, 12:09


comments powered by Disqus