मधमाशांचं पोळं, बनलं मृत्यूचं जाळं - Marathi News 24taas.com

मधमाशांचं पोळं, बनलं मृत्यूचं जाळं

www.24taas.com, रायगड
 
मधमाशांचं पोळं काढणं एका मुलाच्या जीवावर बेतलंय. रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील कुंभिवली ठाकूरवाडीजवळ ही भीषण घटना घडली आहे. या भीषण घटनेनं गावावर शोककळा पसरली.
 
कुंभिवली वाडीतील तीन मुलं मध काढण्यासाठी जंगलात गेले असताना मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात आणि त्याचवेळी लागलेल्या आगीत, एका ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. तर दोन जण गंभीर जखमी झालेत. मधाचं पोळं काढताना हातात टेंभा घेऊन ही मुलं झाडावर चढत होती. मात्र, हातातला टेंभा खाली पडला आणि खाली असलेल्या पालापाचोळ्याला आग लागली. त्याचवेळी मधमाशांनीही या मुलांवर हल्ला चढवला.
 
त्यामुळे एकीकडे मधमाशांचा हल्ला तर दुसरीकडे आगीत होरपळून नारायण मेंगाळ या अकरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. तर अन्य दोन मुलंही आगीत होरपळून गंभीर जखमी झाली आहेत. दिलीप मंगल वीर आणि ओंकार ठोंबरे अशी आगीत होरपळून जखमी झालेल्या मुलांची नावं आहेत.

First Published: Friday, April 13, 2012, 15:42


comments powered by Disqus