Last Updated: Saturday, April 14, 2012, 17:19
संदेश सावंत, www.24taas.com, चिपळूण कोकणातल्या ग्रामीण भागातील अनेक वस्त्या आजही विजेपासून वंचित आहेत. चिपळूण तालुक्यातल्या पाच गावांमध्ये हीच स्थिती आहे. अंधाराशी सामना करावा लागणाऱ्या ग्रामस्थांना गावात अडीच वर्षापूर्वी पोचलेले विजेचे खांब वाकुल्या दाखवत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गालगतची अडरे, टेरव, अनारी, सावर्डे ही गावे गेल्या अनेक वर्षांपासून एक दिवस गावात वीज येईल या आशेवर आहेत. या वस्त्यांमध्ये २००९ मध्ये निव्वळ विजेचे खांब उभारण्यात आले. त्यानंतर सात महिन्यांपूर्वी विद्युत रोहित्र बसवण्यात आलं. मात्र तेही शोभेचेच ठरलंय. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडसर बनलेला गावातला अंधार मुला-मुलींचे लग्न जमण्यातही आड येत आहे.
या वस्त्यांमध्ये त्वरीत वीजपूरवठा व्हावा, अशी मागणी वारंवार करण्यात येतेय. महावितरणनं त्याकडं गांभीर्यानं लक्ष न दिल्यास 1 मेपासून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. लवकरच गावातला अंधार दूर होईल, असं आश्वासन अधिकारीवर्ग देत असला तरी प्रत्यक्ष जोडणी कधी होईल, याबाबत ग्रामस्थ साशंकच आहेत.
First Published: Saturday, April 14, 2012, 17:19