कुंपण खातंय शेत ! - Marathi News 24taas.com

कुंपण खातंय शेत !

झी २४ तास वेब टीम, रायगड
 
मुंबईपासून जवळच असलेल्या रायगड जिल्ह्यातही जमिनीला सोन्याचे भाव मिळत आहेत. त्यामुळे जमीन व्यवहारात आपलं उखळ पांढरं करून घेणारे अनेक आहेत. पण रायगडच्या महसूल विभागानं कोट्वधींची किंमत असलेली सरकारी जमीनच स्वस्त दरात एका खासगी कंपनीच्या खिशात घातल्याचं उघड झालंय.
 
रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन तालुक्यातल्या दिघी बंदराजवळ मोकळी असलेली ही ९० एकर जमीन सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलीय. १९६२मध्ये सरकारनं समाजातल्या दुर्बल घटक म्हणून कोळी समाजाला ही जमीन व्यवसायासाठी दिली होती. मात्र शेजारीच आंतरराष्ट्रीय बंदर होऊ घातलं आणि अनेकांच्या नजरा या जमिनीवर पडल्या. मात्र ठकसेनांच्या आधीही या जमिनीचा व्यवहार करण्यात बाजी मारली ती प्रशासनानंच. एका खासगी कंपनीच्या संचालकाला यातली ३५ एकर जमीन विकण्यासाठी रायगडच्या तत्कालीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनीच लेखी परवानगी दिली आहे. परवानगी बरोबरच प्रशासनानं जमिनीचे साठेखत सुद्धा अवघ्या बावीस लाखात करून संपूर्ण शासकीय यंत्रणा त्या संचालकाला मदत करत असल्याचंच दाखवून दिलंय.
 
या ३५ एकर जमिनीची बाजारभावानं किंमत आहे पन्नास कोटी. ग्रामस्थांनी या व्यवहाराला विरोध केला तर, त्यांच्याचविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेत. कुडगावच्या ग्रामस्थांनी खुद्द मुख्यमंत्र्यांनाही साकडं घातलंय पण कुठूनही त्यांना मदत मिळालेली नाही, कुंपणच शेत खात असल्यानं दाद मागायची तरी कुणाकडे असा सवाल ग्रामस्थ करत आहेत.

First Published: Friday, November 25, 2011, 08:39


comments powered by Disqus