योजना भरमसाठ मुरबाडची लावली वाट - Marathi News 24taas.com

योजना भरमसाठ मुरबाडची लावली वाट

www.24taas.com, मुरबाड
 
मुरबाड तालुक्यात पाणी पुरवठ्याच्या १७८ योजना सात वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र त्यातले जवळपास ९० टक्के पैसे ठेकेदारांनी वसूल केले आहेत. परिणामी अनेक गावं आज तहानलेली आहेत. पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन जाणाऱ्या मुली पाहिल्यावर कुणाचीही मान शरमेनं खाली जाईल.
 
मात्र गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारी यंत्रणेला याची पर्वा नाही. परिणामी आटलेल्या विहिरीतल्या झऱ्यातून गढूळ पाणी काढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दररोज सुमारे चार ते पाच तास पायपीट केल्यानंतरही महिलांच्या हंड्यात पाणी तर येतं मात्र तेही गढूळच. मुरबाड तालुक्यात २२७ वाड्या आहेत. त्यासाठी सुरू करण्यात आलेल्या १७८ पाणी पुरवठा योजना मागील सात वर्षातही पूर्ण झालेल्या नाहीत. अर्थात ठेकेदार मलिदा खाऊन कधीच मोकळे झाले आहेत.
 
३० पाणी पुरवठा कमिट्यांवर भ्रष्टाचाराचे गुन्हेही दाखल झाले आहेत. मात्र सुमारे ९० कोटी रूपये भ्रष्टाचारात जिरले असं म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तालुक्यातल्या झाडघर, पारधवाडी, बोरवाडी, तळे खळ, पोचळे सारख्या अनेक वाड्या आणि पाड्यात पाणी पोहचलेलं नाही. परिणामी दोन वेळच्या अन्नासाठीची मारामार असलेल्या आदिवासींवर आता पाण्यासाठीही पायपीट करण्याची वेळ आली आहे.
 
 
 

First Published: Wednesday, May 9, 2012, 08:57


comments powered by Disqus