Last Updated: Tuesday, November 29, 2011, 10:46
झी २४ तास वेब टीम,
अलिबागरायगडमधील पोलीस भरती वादाच्या भोव-यात सापडली आहे. पात्र उमेदवारांना डावलून जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना प्रवेश मिळाल्यामुळं संताप व्यक्त होतोय.
या भरतीप्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पोलीस दलामध्ये 378 जागांकरिता पोलीस भरती प्रक्रिया गेली आठवडाभर सुरू होती. त्यासाठी राज्यभरातून हजारो उमेदवार आले होते. मात्र, पात्र उमेदवारांना डावलून जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना मागील दाराने प्रवेश दिल्याने पोलीस भरती प्रक्रिये बाबत वाद निर्माण झाला आहे.
लेखी परीक्षेचा निकालही धक्कादायक लावण्यात आल्याचं उमेदवारांचं म्हणणं आहे. मैदानी परीक्षेत कमी गुण मिळालेल्या उमेदवारांची भरती झाल्याचं उमेदवारांचा आरोप आहे. यावर आक्षेप घेतला असता पोलिसांनी आक्षेप घेणा-यांवरच दमबाजी सुरू केली. त्यामुळं उमेदवारांमधून संताप व्यक्त होतोय.
भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांनी रायगडच्या पोलीस अधीक्षकांची भेट मागितली असता त्यांना हाकलून देण्यात आलं. त्याचबरोबर गुन्हे दाखल करण्याची धमकीही देण्यात आली. त्यामुळं शेकडो अन्यायग्रस्त उमेदवारांनी जिल्हाधिका-यांकडे भरतीप्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
First Published: Tuesday, November 29, 2011, 10:46