मुरबाडी नदी प्रदुषित - Marathi News 24taas.com

मुरबाडी नदी प्रदुषित

www.24taas.com, मुरबाड
 
मुरबाड तालुक्यातल्या अनेक गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. त्याचवेळी मुरबाडकरांचा हक्काचा पाण्याचा स्त्रोत म्हणजे मुरबाडी नदी मोठ्या प्रमाणात प्रदुषित झालीय. झी 24 तासनं हा प्रकार उघड केल्यावर संबंधित यंत्रणांना आता जाग आलीय.
 
मुरबाडमध्ये भीषण पाणीटंचाई असतानाच मुरबाडमधली मुरबाडी नदी मात्र प्रचंड प्रमाणात प्रदुषित झालीय. एमआयडीसीनं मुरबाड औद्योगिक  क्षेत्रात फक्त अभियांत्रिकी कारखान्यांना परवानगी दिलीय. तसंच हा ड्राय झोन असल्यानं कारखान्यांमधून पाणी बाहेर जाऊ नये असा नियम आहे. पण या भागात असलेल्या पन्नास ते सत्तर कारखान्यांपैकी काही कारखान्यांतलं पाणी थेट या मुरबाडी नदीत जातंय.
 
या बाबत एमआयडीसी आणि प्रदूषण मंडळाकडे विचारणा केली असता संबंधित कारखान्यांवर कारवाईचं आश्वासन देण्यात आलंय. झी 24 तासनं हा प्रकार समोर आल्यावर मुरबाड नदीतलं पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलंय. १५ ते १६ आदिवासी पाडे या नदीचं पाणी वापरतात. पण नदी प्रदुषित झाल्यानं त्यांच्या हक्काचं पाणी कारखान्यांनी हिरावून घेतलंय.
 

First Published: Thursday, May 10, 2012, 19:16


comments powered by Disqus