Last Updated: Friday, March 15, 2013, 13:56
www.24taas.com, मुंबई श्रद्धा आणि अंधश्रद्धा... या दोघांमधला फरक कळणं फार कठिण नाही. पण, माणसाचा विश्वास कशावर बसेल आणि कशावर नाही हे सांगता येत नाही. असाच एक खेळ रंगला होता विधान परिषद सभागृहात...
विधान परिषद सभागृहात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दुपारी एक वाजल्यापासून तब्बल तासभर बसले होते. त्याच वेळी सभागृहाच्या बाहेर लॉबीत घुबड येऊन बसले होते. हे दृश्यं पाहून अनेक जणांमध्ये खुसपूस सुरू झाली. ‘ज्या ज्या वेळी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर घुबडाने दर्शन दिले त्या प्रत्येक वेळी मुख्यमंत्र्याला जावं लागलंय... आता पृथ्वीराज चव्हाणही जाणार’ अशी प्रतिक्रिया काही अनुभवी डोक्यांनी दिली. तर ‘घुबड हे अपशकुनाचं लक्षण आहे... त्यामुळे आता पृथ्वीराज चव्हाणांचं काही खरं नाही’ असं आपल्या पूर्वजांवर विश्वास ठेवणाऱ्या टाळक्यांचं म्हणणं होतं... अनेकांनी या क्षणाची आठवण म्हणून त्या घुबडाचे फोटोही मोबाईलमध्ये कैद केले.
एकिकडे, अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी विधेयक आणण्याची चर्चा सभागृहात होत असताना घुबडाच्या दर्शनानं कानावर पडलेली या चर्चेनंतर खरंच जादूटोणाविरोधी विधेयकाला संमती मिळू शकेल का? हा प्रश्न उपस्थितांना आणि विवेकबुद्धीवर विश्वास ठेवणाऱ्यांना पडल्याशिवाय राहिला नाही.
First Published: Friday, March 15, 2013, 13:56