Last Updated: Monday, December 10, 2012, 08:51
www.24taas.com, नागपूर राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरात सुरुवात होतेय. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारच्या श्वेतपत्रिकेला उत्तर देण्यासाठी काळी पत्रिका प्रसिद्ध केली आहे. तसंच सरकारच्या चहापानावरही बहिष्कार टाकला आहे. सिंचन घोटाळा हा या अधिवेशनात केंद्रस्थानी राहणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे विरोधकांचे प्रमुख टार्गेट राहणार आहेत.
यंदाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चुणूक अधिवेशन सुरु होण्याच्या आदल्या दिवशीच पाहायला मिळाली. अधिवेशनापूर्वीच सिंचनाची श्वेतपत्रिका आणून अजितदादांनी पुन्हा आपला राज्याभिषेक करुन घेतला असला तरी त्यांच्यापुढची संकटं कमी झालेली नाहीत. सिंचन घोटाळ्यावरुन अधिवेशनात विरोधकांचे प्रमुख टार्गेट उपमुख्यमंत्री अजित पवारच राहणार आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी काळी पत्रिका जाहीर करून सरकारच्या श्वेतपत्रिकेला उत्तर दिलंय तर घोटाळ्यांचे आरोप असलेल्या मंत्र्यांबरोबरच चहा घेण्यात रस नसल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावरही विरोधकांनी बहिष्कार टाकला.
सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीही विरोधकांच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी सज्ज झालेत. श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून सरकारनं सिंचनाची माहिती समोर आणली असली तरी सिंचन घोटाळ्यांसंदर्भात काहीही स्पष्टीकरणं नसल्यानं या मुद्यावर सरकारला विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर द्यावं लागणार आहे.
सिंचन घोटाळ्याबरोबरच राज्यावरील २ लाख ७० हजार कोटी रुपयांचं कर्ज डिसेंबर २०१२ अखेर भारनियनमुक्तीची राज्य सरकारची फसवी घोषणा, वीज खरेदीतील भ्रष्टाचार, वाढती महागाई, सिलिंडर सबसिडी, दुष्काळ निवारण, तसंच कापूस, धान आणि सोयाबिनच्या दरांचा प्रश्न या मुद्यांवरही विरोधक अधिवेशनात सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. गुलाबी थंडीसाठी प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील वातावरण सध्या तप्तच आहे, अशातच विरोधकांच्या आक्रमकतेमुळे अधिवेशनातील वातावरण आणखीनच तापणार यात शंका नाही.
First Published: Monday, December 10, 2012, 08:40