Last Updated: Friday, April 27, 2012, 09:24
www.24taas.com, नवी दिल्ली संमतीनेही सेक्स केला तरी तो बलात्कार ठरणार आहे. हा नियम लागू होणार आहे, तो अठरा वर्षांखालील मुलींसाठी. कारण केद्र सरकारने तसे विधेयक पारीत केले आहे. अठरा वर्षांखालील मुलीशी तिच्या संमतीनेही लैंगिक संबंध ठेवले किंवा लैंगिक संबंध ठेवण्याच्या बहाण्याने लगट केली तर तो थेट बलात्काराचाच गुन्हा ठरणार आहे.
मुलांविरोधातील लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटना आणि अशा प्रकरणांमध्ये ठोठावण्यात येणार्या शिक्षेचे प्रमाण कमी असल्याचे पुढे आले. त्यामुळे केंद्र सरकारने हा कायदा आणला आहे. त्यामुळे अठरा वर्षांखालील मुलीशी तिच्या संमतीनेही लैंगिक संबंध ठेवले तरी तो गुन्हा ठरणार आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास जन्मठेपेचीही शिक्षा होऊ शकेल आणि किमान ५0 हजारांचा दंड होईल.
या विधेयकामुळे बालकांविरुद्धच्या लैंगिक विकृतींविरोधात प्रथमच प्रभावी कायदा होणार आहे. अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवरील बलात्कारासह सर्व प्रकारच्या लैंगिक छळांसाठी जबर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या विधेयकामुळे बालविवाह प्रतिबंधक कायदा व सहमतीने लैंगिक संबंध ठेवण्याची परवानगी देणार्या कायद्यातील फरकही दूर झाला आहे. यापूर्वी १६ वर्षे वयाच्या मुलीसोबत तिच्या सहमतीने लैंगिक संबंध आल्यास तो गुन्हा ठरत नव्हता. आता हे वय १८ वर्षे करण्यात आल्याने बालविवाहांविरोधातही कडक कारवाई होणार आहे.
First Published: Friday, April 27, 2012, 09:24