Last Updated: Tuesday, November 5, 2013, 15:45
www.24taas.com,
तुषार ओव्हळ, झी मीडिया मराठी भाषेत मोठ मोठे संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत. त्यात मराठी विश्वकोश, मराठ्यांचा इतिहास, मराठी वृत्तपत्रांचा इतिहास, मराठी नियतकालिकांचा इतिहास, प्रदक्षिणा अशी एक ना अनेक पुस्तकं आहेत. या पुस्तकांच्या लेखकांचं/संपादकांचं कौतुक करावं तितकं कमी. पण यांनी जो इतिहास शब्दबध्द करून ठेवला आहे, ती लिखाण संस्कृती एका विशिष्ट मर्यादित काळापर्यंत मर्यादित होती. आज त्यांच्या लिखाणाचा वारसा हा टिकवून ठेवण्यात जरी आपल्याला यश आल तरी तो पुढे वाढविण्यात आपण काही प्रमाणात अपयशी ठरलो आहोत. रा.गो.कानडे यांनी मराठी नियतकालिकांचा इतिहास १८३२-१९३७ इथपर्यंत लिहिला आहे. रा.के.लेले यांनीसुध्दा अथक परिश्रम करून १८३२-१९८५ पर्यंतचे मराठी वृत्तपत्रांचा इतिहास लिहिला आहे. १९८५ नंतरच्या मराठी वृतपत्रांनी काय केले, कुठली नवीन वृत्तपत्रे आली, त्यांचे आधुनिकीकरण झाले याचा पाठपुरावा कुणालाही करावासा वाटले नाही हे दुर्दैवच.
‘प्रदक्षिणा’ या पुस्तकात मराठी साहित्याचा इतिहास उपलब्ध आहे तोही दोन खंडात. पण साल २००० पर्यंत. २००० सालपर्यंत मराठी साहित्याचा इतिहास उपलब्ध आहे ही खरंच चांगली गोष्ट आहे पण गेल्या १०-१२ वर्षांत खंडीभर पुस्तकं प्रकाशित झाली. मराठी साहित्यात महत्त्वाच्या गोष्टी घडल्या त्यात तिस-यांदा ज्ञानपीठ पुरस्कार मराठी साहित्याला मिळाले, आणि विजेते करंदीकर आपल्याला सोडूनही गेले. ३७ वर्षांनंतर नेमाडेंची ‘हिंदू’ कांदबरी प्रकाशित झाली, कुसुमाग्रजांची जन्मशताब्दी झाली. इतक्या गोष्टी त्या पुस्तकात नव्याने मांडल्या पाहिजे.
खरंतर मी इतका नकारात्मक भूमिकेचा नाहिये. सकारात्मक गोष्टीही मला दिसतात. पॉप्युलर प्रकाशनांन नुकतचं ‘मराठी रंगभूमीच्या तीस रात्री’ या तीन खंडात्मक ग्रंथात मराठी रंगभुमीचा १५० वर्षांचा इतिहास प्रकाशित केला आहे. यांनी घडवले सहस्रक या पुस्तकात गेल्या सहस्रकातील जागतिक दर्जावरील नामाकिंत लोकांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. साहित्य आकादमी मोठ-मोठ्या व्यक्तीचं २४ भारतीय भाषेत मोनोग्राफ प्रकाशित करतं. उदाहरणार्थ आपल्याला अत्रेंचा अभ्यास करायचा असेल आणि आपल्याला ‘क-हेचे पाणी’ हे ५ खंड वाचायला वेळ नसेल तर आपण त्यांचे मोनोग्राफ अभ्यासू शकतो. ते पुस्तक अवघ ५०-६० पानांच आहे. अशा प्रकारची साहित्य आकदमी ने मिर्झा गालिब, गजानन माडखोलकर, महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे, भारती यांचे मोनोग्राफ प्रकाशित केले आहेत. नितीन प्रकाशन दरवर्षी ‘महाराष्ट्र वार्षिक’ व ‘भारत एक वार्षिक पाहणी’ नावाची पुस्तकं प्रकाशित करतं. स्पर्धा परिक्षेसाठी दर महिन्याला ‘स्टडी सार्कल’ नावाची संस्था दोन अंक प्रकाशित करतात. त्यात दर महिन्याचा चौफेर बाजूने लेखाजोखा मांडलेला असतो. ‘कलमनामा’ नावाचे एक नवीन साप्ताहिक सुरू झाले आहे. त्यात आठवड्यात झालेल्या घडामोडींचा वृत्तांत असतो. मधू मंगेश कार्णिक यांनी ‘सांस्कृतिक महाराष्ट्र’ हा दोन खंडात्मक ग्रंथ संपादित केला आहे. या ग्रंथात १९६० पासून २०१०पर्यंत ५० वर्षातला प्रत्येक क्षेत्रातील इतिहास, सद्यस्थिती व आव्हानं मांडली आहेत. ही सर्व झाली सकारत्मक बाजू.
‘मल्याळम मनोरमा’ दरवर्षी आपलं ‘इयर बूक’ मल्याळम, इंग्रजी व हिंदी या तीन भाषेत प्रसिध्द करतं. असं चांगल्या दर्जाचं ‘इयर बूक’ मराठी भाषेत प्रसिध्द होत नाही.
संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी विश्वकोश मंडळाची स्थापना झाली. एकुण २३ खंडाचं स्वप्न विश्वकोशाचे माजी संपादक कै.तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी पाहिलं होतं. विश्वकोशाचे १८ खंड प्रकाशित झाले आहे. १९ व्या खंडाचे काम चालू आहे. मराठी भाषेत विश्वकोशासारखे संदर्भ ग्रंथ एखाद दुसरेच असतील. विश्वकोश मंडळाला सगळया कोशाचे रूपांतर Soft Copy मध्ये करण्याची अप्रतिम बुध्दी सूचते, विश्वकोश Online करतात, विश्वकोश गीत रचतात पण खूप महत्त्वाचे त्यांना विश्वकोशातली माहिती Update करण्याची बुध्दी सूचू नये, याला नेमकं काय म्हणावं? मराठी विश्वकोशाच्या १५ व्या खंडात ‘लोकपाल’ विषयी साल १९८९ पर्यंत चांगली माहिती दिली आहे. परंतु मागच्याच वर्षी लोकपाल चा एवढा मोठा लढा झाला, तो अभ्यासकांना कसा मिळणार? राजकीय पक्षांचा इतिहास सुध्दा हा जुना किंवा outdated आहे. विश्वकोशाचे १६ खंड जुने असतील, परंतु १७ वा खंड हा २००५ साली प्रकाशित झाला आहे. त्यात ‘वृत्तपत्रे’ हा विषय आहे. त्यात ‘दै.सामना’ ‘दै.लोकमत’ या वृत्तपत्रांची नोंदी नाहीत.
काही लेखकांनी सामाजिक, राजकीय समस्या, सामाजिक, राजकीय, आर्थिक घडामोडी, विकासाचे टप्पे त्यांची गुतागुंत तसेच भविष्यातील अंदाज यावर दर्जेदार लिखाण करून ठेवले आहे. त्या लिखाणाचा किंवा संदर्भाचा आजही अभ्यासकांना होतांना दिसून येतो. परंतु कालातंराने ही संदर्भ साहित्याची पालखी कुठेतरी विसावलेली दिसून येते. मराठी विश्वकोश, मराठी संस्कृतीकोश यामध्ये विशिष्ट अक्षाराखाली येणा-या संकल्पना जुन्या आहेत. त्या अक्षरांतर्गत मग ते कोणतेही असो. गेल्या दशकात आलेल्या नवीन शब्दांचा किंवा संकल्पनाचा समावेश आज या संदर्भ ग्रंथामध्ये दिसून येत नाही. वर्तमानपत्रे व मासिके यांच्याद्वारे ठळक राजकीय, सामाजिक व आर्थिक बाबींवर सुसंगत व सुबध्दपणे लिखाण केले जाते. परंतु या लिखाणाचे विषयावर सांघिक संकलन अल्प प्रमाणात झाल्याचे दिसून येते. ही संदर्भ साहित्याची पालखी मराठीतल्या प्राध्यापक, तज्ञ, भाषांतरकार, संपादक, थोर साहित्यिक यांनी पुढे नेली पाहिजे तरच मराठी भाषा आणि संदर्भ साहित्य समृध्द होईल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, November 5, 2013, 15:45