खान्देशनी आखाजी, khandesh akhaji

खान्देशनी आखाजी

खान्देशनी आखाजी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई


आपल्या खान्देशात अक्षय्य तृतीयेला खूप महत्त्व आहे. त्याला तिथे `आखाजी` म्हणतात. माहेरवाशिणीचा हा सण लोककलांनी समृद्ध केलाय.

खान्देशात अक्षय्य तृतीया सणास विशेष महत्त्व आहे. अहिराणी भाषेत `आखाजी` म्हणूनही हा सण प्रसिद्ध असून खापरावरील मांडे, आमरस, भात, काळ्या मसाल्याची आमटी अशी मेजवानी हे या सणाचं वैशिष्ट्य. या दिवशी पितरांना गोडधोड जेवण दिलं जातं. तसंच नवी लाल घागर आणि त्यावर डांगर (खरबूज) ठेवून पूजा घातली जाते. सासुरवाशीणी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. या सणाला त्यांना आपल्या माहेरी जाण्याची संधी मिळते.

स्त्रियांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा असतो. चैत्रात बसवलेल्या चैत्रगौरींचं विसर्जन याच दिवशी विधीवत करतात. ग्रामीण भागात घराघरात हिंदोळा बांधला जातो किंवा चौकातील झाडाला हिंदोळा बांधून तरुण मुली, स्त्रिया उंच झोके घेताना दिसतात. ग्रामीण भागातील विशेषत: अहिराणी बोलीतील लोकगीतं मोठ्या उत्साहाने गायली जातात. आखाजीच्या गाण्यांनी अहिराणी काव्यविश्व समृद्ध केलं आहे. विशेषत: सासुरवाशीण स्त्रिया आपल्याला कोणीतरी घ्यायला येणार या आशेने गाणी गातात.

आखाजी सारा सण

सूनबाई टिपरना खेवाले

बाप उना लेवाले

चाल पोरी आखाजी खेवाले

भाऊ उना लेवाले

चाल बहीण टिपरना खेवाले

भावजायी कशी म्हणे

चाल चाल नवीनबाई फुगडी खेवाले...

अशा काव्यांच्या स्वरूपात मनातील भावना, हर्ष, आनंद, विचार, प्रकट करतात.

या तिथीस महत्त्व येण्याचं अन्य कारण असंही सांगितलं जातं की, हा कृतयुगाचा (काहींच्या मते त्रेताचा) प्रारंभदिन आहे. परशुरामाचा जन्म या दिवशी झाला म्हणून या दिवशी प्रदोषकाळी परशुरामाची पूजा करून त्याला अर्ध्य देतात. ऋषभदेव याने एक वर्ष आणि काही दिवस एवढ्या काळानंतर हस्तिनापूरचा राजा श्रेयांस याच्या घरी या तिथीस ऊसाच्या रसाचं प्राशन केले. त्यामुळे राजाची भोजनशाला अक्षय्य झाली. म्हणून या तिथीला `अक्षय्य तृतीया` असं नाव पडलं, अशी अख्यायिका आहे.

प्रत्येक खेड्यात पुरणपोळ्यांचा बेत असतो. या पुरणपोळ्या मातीच्या खापरावर भाजल्या जातात, त्यावर गावरान तूप टाकल्यावर त्याची लज्जत अधिकच वाढते. शहरीकरणामुळे आता खापरावरच्या पुरणपोळ्याच दुमिर्ळ झाल्या असल्या तरी खान्देशातील ग्रामीण भागात मात्र सणासुदीला त्याचाच पाहुणचार केला जातो.

पत्त्यांचे डाव रंगतात...
आखाजीनिमित्त शहरी भागासह ग्रामीण भागात पत्त्यांचे डाव रंगू लागतात. वडाच्या झाडाखाली, शेतात मोकळ्या जागी, कधी अक्षरश: मंडप टाकून पत्ते खेळण्याचा आनंद मोठ्यांबरोबर लहानही लुटतात. आखाजीला कोण किती जिंकलं आणि कोणी किती गमवले याची चर्चा गावात पुढील आठ दिवस असते.

आखाजीच्या सणामुळे हातमजुरी करणारे मजूर दोन दिवस कामाची सुट्टी घेऊन गावातील मोकळ्या जागेवर पत्ते खेळतात. त्यात तीन पानी, रमी, फटकी असे विविध प्रकार पैसे लावून खेळले जातात. या पत्त्यांच्या खेळात हजारो रूपयांनी उलाढाल होत असते. आखाजीच्या चार दिवस अगोदर आणि नंतर चार दिवस असे आठ दिवस पत्त्यांचा अड्डा सुरू असतो. अनेक जण पत्त्यांच्या खेळात हरतात तर अनेक जण जिंकतात. यामुळे बऱ्याच वेळा पत्त्यांच्या अड्ड्यांवर वादही निर्माण होतात. मात्र अक्षय्य तृतीया (आखाजी) आटोपली, की हे वादही मिटतात. हा सण जसा सासुरवाशीणला आनंद देणारा आहे. तसाच पत्ते खेळणाऱ्या शौकिनांनाही आनंद देणारा आहे. त्यामुळे सर्व जण या सणाची वाट पाहत असतात.


प्रशांत जाधव, संपादक, 24taas.com


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 2, 2014, 17:46


comments powered by Disqus