Last Updated: Monday, August 13, 2012, 21:16
पंकज दळवी मराठीच्या कुठल्याही शब्दकोशात नसणारा “माहित्या”हा शब्द आपल्या राज्याचे गृहमंत्री ‘माननीय’ आणि ‘सन्मानीय’ आर. आर. पाटील ऊर्फ आबांच्या शब्दकोशात मात्र नक्की आहे... कारण बॉम्बस्फोट असो किंवा एखादा दहशतवादी हल्ला, दिवसा-ढवळ्या होणारे गुन्हे असोत की मीडियावरचा हल्ला... “तपास सुरू आहे आणि माहित्या घेऊन सांगतो” हे पाठ करून ठेवलेलं ठेवणीतलं उत्तर नेहमीचआबांच्या तोंडी असतं...
“मोठ्या मोठ्या शहरात, असे छोटे-मोठे हल्ल्या”नंतर राजीनामा देणारे आबा “हारकर भी जितनेवाले को बाजीगर कहते है” या फिल्मी डायलॉगच्या अविर्भावात पुन्हा गृहमंत्रीपद स्वीकारून माहित्या घेण्यास सज्ज झाले... मुंबईतील सीएसटीला झालेल्या हिंसाचाराचा तणाव मी स्वत: अनुभवलाय... त्यामुळे आता या ठेवणीतल्या उत्तरांचा कंटाळा आलाय...
सकाळ टाइम्सचे ज्येष्ठ फोटोग्राफर प्रशांत सावंत यांच्यावर झालेला हल्ला खरोखरच आम्हा पत्रकारंना डिस्टर्ब करून गेला...हिंसाचार माजवणाऱ्या त्या लोकांनी आमच्या प्रशांत सावतांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला... जळणाऱ्या पोलिसांच्या गाडीत प्रशांत सावंतांना टाकण्याच प्रयत्न झाला... मात्र केवळ नशीब बलवत्तर म्हणून प्रशांतजी थोडक्यात बचावले... आणि हा हिंसाचार कमी होता म्हणून की काय पोलिसांनी मीडियालाच आपल्या दांडुक्याचा चोप दिला आणि दंगल माजवणाऱ्या हजारोंपैकी फक्त २३ जणांना बेड्या घालून पोलिसी खाक्या मिरवला...
साधारणपणे दोन कोटी किंमत असणा-या ओबी व्हॅन जाळण्यात आल्या... अनेक कॅमेरे तुटले... पोलिसांना मीडियावर का रोष होता हे कळत नाही... कदाचीत गृहमंत्रालयाकडून आलेल्या आदेशामुळे निर्माण झालेली हतबलता पोलिस मीडियावर काढत होते की काय असा प्रश्न मानत निर्माण होतो...
समोर महिला पोलिसांशी छेडछाड होत होती, पोलासांनाना फटकवत होते, पोलिसांच्या गाड्या जाळल्या जात होत्या मात्र असं असून सुद्धा पोलिस वरच्या आदेशामुळे कादचीत हतबल होते... म्हणूनच मनात आणि काठ्यांमध्ये असणारा रोष मीडियावर निघाला... मी पोलिसांची मनःस्थिती समजू शकतो...नेहमी लढाईची तयारी करायची... मात्र लढाईची वेळ येते तेव्हा वरच्या आदेशामुळे शेपूट घालून रागावर नियंत्रण ठेवायचं अशी माझ्या पोलीस जवानंची राज्यात स्थिती आहे...
तर मुद्दा मीडियावरच्या हल्ल्याचा... झी २४ तासचा पत्रकार अमित जोशीवर जीवघेणाहल्ला करणारे हल्लेखोर पुराव्या अभावी मोकाट सुटले... तरी सुद्धा स्वच्छ चारित्र्यांचा टेंभा मिरवणारे आबा अजूनही माहित्या घेत आहेत... आणि पत्रकार सुरक्षेच्या कायदा आणण्याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोलीन असं गुळगुळीत उत्तर देतात... मुंबईत एका महिला वकीलाची हत्या होते, दिवसढवळ्या दरोडे टाकले जातात, गजबजलेल्या ठिकाणी बॉम्बस्फोट होतात... तरीसुद्धा गृहमंत्री आपल्या पदावर कायमच...एखाद्या सरकारी कर्मचा-याकडून कामात दिरंगाई, चूक झाल्यास सरळ कारवाईचा बडगा उचलला जातो... आणि या राज्याच्या सुरक्षेचे धिंडवडे निघाले तरी आपले मायबाप पदावर कायम...त्यामुळे फेविकॉलनं आता आबांना ब्रॅन्ड एबॅसिडर म्हणून साईन करावं... कारण मोठ्या शहरावरच्या छोट्या हल्ल्यानंतर पुन्हा गृहमंत्रीपदाला चिकटणा-या आबांना फेविकॉल का मजबुत जोडच म्हणावं लागेल...
First Published: Monday, August 13, 2012, 21:16