Last Updated: Sunday, March 17, 2013, 11:39
सुरेद्र गांगणgangan.surendra@gmail.com
राज ठाकरे. राजकीय परखड आणि स्पष्ट वक्ता. युवकांचा आयकॉन. ज्यांच्या बोलण्यानंतर तसचं इशाऱ्यानंतर महाराष्ट्र नव्हे तर देश पुरता ढवळून निघतो. असं एक वादळी व्यक्तिमत्व. बरोबर सात वर्षांपूर्वी नऊ मार्चला महाराष्ट्राच्या राजकारणात ‘तुफान’ आलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापनी झाली. आज महाराष्ट्रात एक राजकीय नजर टाकली तर मनसे ‘राज’ दिसून येत आहे. या मागचं काय आहे गुपित? हे कसं काय शक्य झालं?, असे एक ना अनेक प्रश्न उभे राहतात.
बाळासाहेब ठाकरे. असामान्य व्यक्तिमत्व. उभ्या महाराष्ट्राने त्यांना उचलून धरलं. शिवसैनिकांनी त्यांना हृदयसम्राट ही पदवी बहाल केली. या दिग्ग्ज नेत्याच्या तालमीत तावूनसुलाखून निघालेले राज ठाकरे. बाळासाहेब हे राज यांचे काका. पुतण्याला राजकारणाचे बाळकडू मिळाले ते काकांकडूनच. अंगा खांद्यावर वाढलेले राज शिवसेनेत युवक नेत्याच्या माध्यमातून जनतेपुढे आले. राज यांच्या अंगी दिसली ती बाळासाहेबांची स्टाईल. परखड बोलणी. मुळात राज हे बाळासाहेबांप्रमाणे व्यंगचित्रकार. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात कलात्मकता. ही कलात्मकता चांगली राजकारणात आत्मसात केली.
बाळासाहेबांचा मंत्र. दुसरी महत्वाची गोष्ट. अन्यायविरोधात पेटून उठा, हा बाळासाहेबांचा मंत्र. त्याच विचारातून शिवसेना मोठी झाली. अन्याय सहन करू नका, असे बाळासाहेब सांगायचे. प्रत्येक शिवसैनिकांच्या हृदयात बाळासाहेबांचे विचार धगधगत राहत. राज ठाकरे हेही एक शिवसैनिक. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारात वाढलेले राज, आपल्यावर अन्याय होतोय, असं वाटू लागल्याने ते अस्वस्थ झालेत. एकदम राजकारणापासून अलिप्त राहिलेत. मनाची घालमेल सुरू होती. पण वादळापूर्वीची ही शांतता होती, हे काही दिवसातच स्पष्ट झाले. मी शिवसेना सोडली, असं जाहीर केलं आणि एक मोठी ठिणगी पडली महाराष्ट्रातील राजकारणात. आता काय होणार, असा अनेकांना पडलेला प्रश्न. तर काही विरोधकांना आतल्या आत गुदगुदल्या झाल्या. झालं ते बरं झालं, अशी कुजबूज सुरू झाली. मात्र, राजना चांगला प्रतिसाद मिळतोय. आता ही कुजबुज भीती पोटीही वेगळ्या राजकीय समीकरणामुळे सुरू झाली आहे.
दौरा.राज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले. राज यांच्या पाठिमागे खंभीरपणे युवा पिढी राहिली. त्यानंतर राज यांनी मुंबईत शिवाजी पार्कवर विराट सभा घेतली आणि पक्ष स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांना मिळालेले यश हे भावनिक आहे, असे राजकारणात ऐकायला मिळाले. तर काही नेत्यांनी राज लहान (बालीश) आहे. त्यांनी महाराष्ट्रातील प्रश्न समजून घेतले पाहिजे. लोकांच्या भावना ओळखल्या पाहिजेत. पक्ष स्थापन करणं सोपं आहे, त्याला मोठं करण अवघड आहे, अशी बोचरी टीका केली. राज ठाकरे यांचा पक्ष अळवावरचं पाणी आहे, टिपनी केली गेली. आज राज यांच्याकडे १२ आमदार आहेत. काही नगरपालिका मनसेच्या ताब्यात आहेत. पालिका सदस्य, अनेक ठिकाणी जिल्हा परिषद, ग्रामपंचाय सदस्य आहेत. राज यांच्यावर तोंडसुख घेणाऱ्या या सर्वांना युवा पिढीच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी असं ‘कडक’ उत्तर दिलंय. आता महाराष्ट्रात दौऱ्यात राज यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांना मनसेची दखल घ्यावी लागत आहे. तर कोणी म्हणत आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला रोखण्यासाठी विशाल महायुती झाली पाहिजे. ते खरंही आहे. मात्र, असं मुळात होणार नाही. कारण आपले अस्तीत्व हे संघर्षातून उभे करणारे राज सहजासहजी मान्य करणार नाहीत. तसंच राज यांनी आधी ते फेटाळून लावले होते. पुन्हाही राज यांनी तेच भाष्य केलंय. राज हे ‘राज’ आहेत.

`राज`कारण. राज ठाकरेंचे मर्यादीत राजकारण. ‘मराठी’ आणि ‘भैय्या’ या विषयापुरते मनसेचे हे राजकारण आहे. त्यांच्याकडे विकासाचा काही एक विषय नाहीत. काही ध्येय नाहीत. केवळ लोकांचे मनोरंजन करणारा पक्ष, अशी टीका होत आहे. ते एका अर्थाने खरंही वाटतं. मात्र, ज्यांनी आतापर्यंत सत्ता भोगली त्यांनी काय केलाय विकास, असा ही प्रश्न दुष्काळपासून मनात येतो. केवळ बारामती सुपीक झाली म्हणजे महाराष्ट्राचा विकास होतो का? ज्या माढा मतदार संघातून राष्ट्रवादीचे शरद पवार आले, त्या मतदार संघाचा किती विकास झालाय. त्याठिकाणी बारामतीचा कित्ता का गिरवला गेला नाही? प्रत्येक जिल्ह्यात एक बडा नेता आहे. या नेत्याकडची श्रीमंती सर्व काही सांगून जाते. मात्र, हे नेते आपल्या भागाचा विकास का करत नाही, यामागचं कोडं काही समजत नाही. दुष्काळ पडल्यानंतर मदतीची याचना करावी लागते. ज्या जनतेच्या जीवावर निवडणून येतात ते नेते आपल्या खिशातील काहीही सोडत नाही. केवळ एक दिवसाचे मानधन देताना धन्यता मानतात. ही यांची समाजाप्रती श्रीमंती.
विकासाची ब्ल्युप्रिंट. राज ठाकरे यांनी माझ्या हाती सत्ता द्या, मग बघा विकास कसा असतो ते!, अशी साद घालताना दिसत आहेत. मात्र, पक्ष स्थापन केल्यापासून राज ‘ब्ल्युप्रिंट’वर काहीही बोलत नाही. मी जनतेसमोर जाहीर याबाबत सांगेन असे सांगत आले आहेत. आज सात वर्ष झालीत. ही ‘ब्ल्युप्रिंट’ बाहेर निघालेली नाही. अनेकवेळा राज यांना प्रश्न विचारला गेला. यावर अभ्यास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. ते खरंही असेल. कारण राज हे विकासाबाबत माहिती जाणून घेताना दिसत आहेत. गुजरात दौरा, हे त्याचेच प्रमाण मानले जात आहे. आता राज यांना विकासाची चुणूक दाखवावी लागेल. ज्या ठिकाणी सत्ता आहे. तेथील हा विकास झालाच पाहिजे. नाहीतर जनता मनसेला जागा दाखविण्यास मागेपुढे पाहणार नाही. तसचे विकासाची ‘ब्ल्युप्रिंट’ लवकर जाहीर होण्याची गरज आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी उमेदवारांची परीक्षा घेतली गेली. तसचे वचक नामा जाहीर केला गेला. मात्र, म्हणावी तशी वचन दिसत नाही. त्यामुळे जनतेपुढे मनसेला पर्यायाने राज यांना परीक्षा द्यावी लागेल. त्याचा निकाल काय असेल, ते राज यांनी ओळखावा हीच माफक अपेक्षा. आपण सात वर्षांत काय कमावलं आणि काय गमावलं याचा विचार केला पाहिजे. पुढे काय करायचेय याचा जरूर विचार करावा, अन्यथा राज तुम्हाला जनता माफ करणार नाही. राज वादळाला, जनता वादळ भारी पडेल. मनसेचं 'मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा', हे हे केवळ घोष वाक्य राहिल, हेच सांगणे.
First Published: Monday, March 11, 2013, 08:28