अर्थसंकल्पीय अधिवेशन दुष्काळावरून गाजणार, Budget Session in mumbai

अर्थसंकल्पीय अधिवेशन दुष्काळावरून गाजणार

अर्थसंकल्पीय अधिवेशन दुष्काळावरून गाजणार
www.24taas.com,मुंबई

राज्याच्य़ा विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होतंय. अनेक विषयांमध्ये सरकार अपयशी ठरल्याचं भांडवल विरोधक करणार असल्यानं हे अधिवेशन वादळी ठरणार, हे स्पष्ट आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे.

दुष्काळ हाताळण्यात सरकार कमी पडत असल्याची टीका विरोधक करतायत. दुष्काळाला सिंचन घोटाळाच कारणीभूत असल्याचा आरोप केला जात असताना या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी नेमलेल्या माधव चितळे यांच्या SITला अधिकारच नसल्याबद्दल टीका होतेय. भंडा-यात अल्पवयीन बहिणींवर बलात्कार करणारे आरोपी अद्याप फरार आहेत. हा मुद्दाही गाजणार हे उघड आहे.

राज्याची बिघडलेली आर्थिक स्थिती, मंत्र्यांचे भ्रष्टाचार आणि 18 मंत्र्यांवर कोर्टांनी ओढलेले ताशेरे, मुंबई आणि उपनगरांमधली रखडलेली विकासकामं, सहकार घटनादुरुस्ती असा बराच दारुगोळा विरोधकांच्या पोतडीत आहे. मात्र विरोधकांमध्येच एकी नसल्याचं चित्र सध्या राज्यात निर्माण झालंय.

शिवसेना आणि मनसेमध्ये एकोपा होण्याची शक्यता दिसत नाही. राज ठाकरे यांनी भाजपचे एकनाथ खडसे यांच्यावर सेटलमेंट करत असल्याचा आरोप केलाय. आठवले यांनाही राज यांचा सहवास मान्य नाही. अशा स्थितीत प्रचंड दारूगोळा असूनही विरोधक त्याचा प्रभावी वापर करणार का, अशी शंका आहे.

या अधिवेशनात दुष्काळाचाच मुद्दा प्रामुख्यानं गाजणार असल्याची चुणूक पहिल्याच दिवशी दिसतेय. सकाळी साडेदहाच्या सुमारास वाळलेलं गवत आणि रिकामे हंडे घेऊन सेना-भाजपचे विधानभवनात मोर्चानं जाणार आहेत.

या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकूण 9 विधेयकं मांडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय.

First Published: Monday, March 11, 2013, 09:25


comments powered by Disqus