ढिगभर पाठींबा आणा आणि मला राष्ट्रपती म्हणा" - Marathi News 24taas.com

ढिगभर पाठींबा आणा आणि मला राष्ट्रपती म्हणा"


 
पंकज दळवी 
www.24taas.com
 
देशाचा राष्ट्रपती बनण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता सांगा....
१)    तो भारताचा नागरीक असावा
२)    त्याने वयाची ३५ वर्षे पुर्ण केलेली असावीत
३)    लोकसभेचा सदस्य बनण्यासाठी लागणा-या सर्व निकषांवर तो पात्र असावा
४)    ती व्यक्ती लोकसभा किंवा राज्यसभेचा सदस्य नसावी.
शाळेत असताना नागरीक शास्त्रातील या प्रश्नाचं उत्तर आपण सहज लिहायचो... आणि २ गुण  खिशात घालायचो... मात्र
१)    त्याला ढिगभर राजकीय पक्षाचा पाठींबा हवा... .
२)    सोबत मोठी राजकीय इच्छाशक्ती हवी...
३)    राजकीय पक्षाच्या विचारधारेनुसार निर्णय घेण्याची लवचीकता त्याच्यात हवी...
हे प्रॅक्टीकल निकष आपल्याला शाळेत कोणी सांगितलेच नाहीत... त्यामुळे सध्या या निकषांवर लढवली जाणारी राष्ट्रपदाची निवडणूक खरी की पुस्तकी निकष खरे?  फक्त पुस्तकी निकष खरे असते तर समाज कार्य़ात आपलं आयुष्य झोकून देणारा बाबा आमटेंसारखा एखादा लोकांचा कैवारी या पदापर्यंत पोचला असता...
 
 
राष्ट्रपती पद हे देशातील सर्वोच्च संविधानीक पद... ए.पी.जे अब्दुल कलामांसारख्या बिगर राजकीय व्यक्तीनं हे पद भूषवलं... सर्वपक्षीय पाठींबा मिळवून एक वैज्ञानिक देशाच्या राष्ट्रपतीपदावर आरूढ झाला... कलामांसारख्या व्यक्तीला सर्व राजकीय पक्षांनी पाठींबा देऊन त्यावेळी राजकीय प्रगल्भतेचं दर्शन घडवलं... मात्र कलांमांची टर्म पूर्ण झाली आणि ही राजकीय परिपक्वता कुठे आटली तेच कळलं नाही...
 
 
एकमुखाने कलांमाना पाठींबा देणारे पक्ष कलांमाच्या पुनर्निवडीबाबत ‘कामाली’चे बॅकफुटवर गेले...राष्ट्रपतीपदाची माळ महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्या प्रतिभाताई पाटील यांच्या गळ्यात पडली... आणि आता पुन्हा जेव्हा नव्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचा शोध सुरू झाला तेव्हा यूपीएनं अब्दुल कलामांच्या नावाला चक्क विरोध केला... केंद्रीय अर्थमंत्री आणि जेष्ठ काँग्रेस नेते प्रणव मुखर्जी यांची उमेदवारी जाहीर झाली... तेव्हा विचार आला की केवळ पुस्तकी निकषांवरील व्यक्ती राष्ट्रपती बनू शकत नाही का ? सध्यातरी त्याचं उत्तर नाही असंच वाटतं...
 
कदाचीत बिगर राजकीय राष्ट्रपतीवर सत्तधारी पक्षाचं नियंत्रण राहत नाही... त्यामुळे राष्ट्पतींच्या माध्यमातुन खेळल्या जाणा-या राजकीय डावपेचांना खीळ बसू शकतो...  राष्ट्रपती जर राजकीय पक्षांच्या विचारधारेतील असले तर त्याच्याकडून घेतल्या गेलेल्या किंवा घेतल्या जाणा-या निर्णयावर तो ज्या पक्षाशी संबंधीत आहे त्याच्या राजकीय गणितांचा प्रभाव असण्याची शक्यता आहे ...त्यामुळेच राष्ट्रपती पदी राजकीय व्यक्तीला बसवण्याची चढाओढ सुरू होते...
 
 
उदाहरणादाखल पहायचं झाल्यास राष्ट्रपतींकडे प्रलंबित असलेली फाशीच्या दया अर्जाची प्रकरणं... देशाच्या सर्वोच्च वास्तूवर अर्थात संसद भवनावर हल्ला करणारा अफजल गुरू अजूनही राष्ट्रपतींच्या निकालाची वाट पाहतोय... अफजलला फाशी दिली तर आपली व्होट बॅक दुरावेल की काय अशी चिंता सरकारला सतावतेय का असा प्रश्न माझ्यासह सर्वसामान्यांना पडतो...म्हणजेच कुठलाही निर्णय घेताना त्या निर्णयाचा त्याच्या राजकीय पक्षावर आणि पक्षाच्या व्होट बॅकवर होणारा परिणाम याचा विचार करावाच लागतो...गेल्या काही वर्षात अब्दुल कलाम सोडले तर राष्ट्रपती हे राजकीय पक्षाशीच जोडलेले होते... त्यामुळे वर म्हटल्याप्रमाणे त्याला ढिगभर राजकीय पक्षाचा पाठींबा...सोबत मोठी राजकीय इच्छाशक्ती हवी...आणि राजकीय पक्षाच्या विचारधारेनुसार निर्णय घेण्याची लवचीकता हे गुण ग्राह्य धरले जाउ लागले...
 
 
गेल्या काही दिवसांपासुन सुरू असलेल्या बैठका, चर्चा, रुसवे-फुगवे, मनधरणी हे याचचं एक उदाहरण आहे... वास्तविक अफजल गुरू सारख्या देशद्रोह्याला फाशी दिलीच पाहीजे असं देशातील राजकारणापासून दूर असलेल्या सर्वच जातींच्या लोकांची इच्छा आहे... मात्र जोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाशी (सत्ताधारी किंवा विरोधक) नाळ जोडलेला राष्ट्रपती आहे तोपर्यंत अफजल गुरूसारख्यांच्या फाशीची यादी २२ वरून २२०० पर्यंत पोहचेल... अफजल गुरू हे प्रातिनिधीक उदाहरण झालं... जे राष्ट्रपतींच्या निर्णय घेण्याच्या तत्परतेवर भाष्य करतं... त्यामुळे दुर्दैवानं म्हणावं लागतंय सध्याची देशाची परिस्थिती “ढिगभर पाठींबा आणा आणि मला राष्ट्रपती म्हणा" अशीच आहे...
 
 
 

First Published: Tuesday, June 26, 2012, 22:07


comments powered by Disqus