देवराई - Marathi News 24taas.com

देवराई

ऋषी देसाई
www.24taas.com
पावसाळा  सृष्टीचा नव्या अविष्काराचा महिना.  रखरखीत झालेल्या वसुंधरेवर हिरवी शाल पांघरणारा हा ऋतु. याच महिन्यात निसर्गोत्सवाला जोड मिळते ती शासकीय आणि सामाजिक वनीकरणाची. आज ग्लोबल वॉर्मिंगच्या झळा जाणवत असताना वनराईची आपल्याला प्रकर्षाने आठवण होते.  शहरीकरणाच्या, औद्योगिकीकरणाच्या नावाखाली जंगलाची खुलेआम कत्तल केली जाते. पुणे-मुंबई-नाशिक-औरंगाबाद-कोल्हापूर या महानगरांमध्ये वसाहतीसाठी शहरं पार डोंगरमाथ्यावर जाऊन कधी भिडली कळलंच नाही. आता तर सर्व महानगरांमध्ये मेट्रो आणि महामार्ग चौपदरीकरणाच्या नावा़खाली वृक्षांची बेसुमार तोड केली जातेय. बदलत्या समाजरचनेत माणूस माणसालाच विसरत चाललाय, तिथे  पंचमहाभूतं, निसर्गदेवता, वनदेवता, वनराई या गोष्टींना कोण लक्षात ठेवणार? माणूस स्वतःच्या स्वार्थापायी निसर्गावर मात करुन 'वसुंधरा बचाव'च्या गप्पा ठोकू लागलाय. वनराई वाचवणं जरी शक्य नसलं तरी 'देवराई' मात्र वाववायलाच हव्यात. आता काहींना प्रश्न पडेल की, देवराई वाचवणार काय? देवराई हा तर सिनेमा आहे तो पहायला हवा असं म्हण ना! मुळात गंमत हीच आहे की शहरी लोकांचा देवराई म्हणजे स्क्रिझोफेनिया तर ग्रामीण लोकांचा देवराई म्हणजे भुताखेताची वस्ती हा गैरसमज आहे. दोघेही आपल्या जागेवर योग्यच आहेत. 'देवराई' म्हणजे नेमकं काय आणि आजच्या काळात त्याची गरज, या लेखातून सांगण्याचा प्रयतत्न...
 
 
'देवराई' म्हणजे देवांचं जंगल. गावच्या आजूबाजूला असलेल्या रानाचा काही भाग देवासाठी राखून ठेवला जातो. या भागास देवराई म्हणतात. देवराई म्हणजे देवांसाठी राखीव ठेवलेलं पवित्र वन. वृक्षावर देवतांचा आणि पूर्वजांचा वास असतो. त्यांचं आश्रयस्थान सुरक्षित रहावं हे आपलं कर्तव्य, या भावनेन संरक्षित केलेलं वन म्हणजे 'देवराई'.या भागामध्ये कुणीही प्राण्यांची शिकार करत नाही, कोणताही वृक्ष तोडत नाहीत. त्यामुळे त्या भागातले वैशिष्ट्यपूर्ण प्राणी, वनस्पती, आपोआप जतन केले जातात. गावाची पंचायत, वनखातं देवराईची काळजी घेते. ही झाली सोप्या भाषेतील देवराईची ओळख. आता याच देवराईची उदाहरण देऊन ओळख देते. मेळघाट सार्‍यांनाच ठाऊक आहे. जैवविविधतेने परिपूर्ण व सुपीक शेतजमीन मेळघाटात असल्याने गवताळ कुरणे व त्यावर उपजिविका करणारे हरीण, सांबर, काळवीट, गवा यासारखे अनेक तृणभक्षी प्राणी तिथे पहायला मिळतात. आदिवासी समाज हा मेळघाटातील मूळ रहिवासी. त्यांच्या परंपरा, सांस्कृतिक मूल्यं आणि येथील वनांच्या संरक्षणासाठी स्थानिक लोकांनी स्थापन केलेल्या वनरक्षक समित्या या फार पूर्वीपासून वनसंवर्धनातील महत्वाच्या घटक राहिल्या आहेत. गंमत म्हणजे त्या आदिवासींच्या, 'आम्हाला ग्रीन कार्ड द्या किंवा आम्हाला वनखात्यात घ्या तरच आम्ही जंगल सांभाळू अशा मागण्या नसूनही ते वनरक्षणाचे काम मनापासून करतात. मेळघाटातील आदिवासी अतिशय श्रद्धापूर्वक या वनाची पूजा करायचे. या श्रध्देतूनच आजवर येथील वनाचे संरक्षण आणि संवर्धन झाले आहे.मेळघाटच नाही तर आपल्या संपूर्ण भारतीय संस्कृतीत देवराई हा महत्त्वाचा घटक होता. कालाय तस्मै नमः म्हणत आपण त्याला सोयीस्करपणे विसरत आहोत.

 
आपल्या देशात अनेक प्रांत, अनेक भाषा, अनेक जमाती आहेत. त्यांच्या असंख्य परंपरा आणि तेहतीस कोटी देव आहेत. अगदी दगडापासून ते थेट पाण्यालाच देव मानणारे अनेक जण आहेत.या सर्व भिन्नतेत सगळ्यांमध्ये दुवा साधणारी परंपरा आहे देवराईची. भारताच्या कानाकोपर्‍यांत अगदी हिमाचल प्रदेशातील बर्फाळ भागातून ते उष्ण,दमट केरळपर्यंत तसेच राजस्थानच्या रखरखीत वाळवंटापासून ईशान्य भारतातल्या डोंगराळ मणिपूर ही परंपरा शेकडो वर्षांपासून जिवंत आहे. देवराईंना भारतात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते, कोकणात राय, महाराष्ट्रात देवराई, पश्चिम महाराष्ट्रात देवराठी किंवा देवाचे बन, हिमाचल प्रदेशात देवभूमी, राजस्थानात अरवली आणि विंध्य पर्वतरांगांमध्ये मंदिरवन, देवरा किंवा ओरन, गोव्यात देवरान, केरळमध्ये काव्यू तर मणिपूरमध्ये मामखप किंवा मऊहक. या वनराईत शंभर-सव्वाशे एकर क्षेत्रापासून ते एकाच वृक्षाच्या वनराईचाही समावेश असतो. ( उदाहरणार्थ मोचेमाड इथे एका वृक्षाची राई आहे.) जिथे प्रश्न झाडांच्या संख्येचा नसून त्यामागच्या भावनेचा असतो. कारण या देवरायांच्या संरक्षणासाठी अनेक अलिखित, न मोडता येणार्‍या रुढी परंपरा आहेत. देवराईंमध्ये वृक्षतोडीला परवानगी नाही, व्यक्तिगत स्वार्थासाठी वापर करण्याची सक्त मनाई आहे. हे स्थान एवढं पवित्र मानतात की काही ठिकाणी आत शिरताना पादत्राणंही काढावी लागतात. हा सारा श्रध्देचा भाग आहे.
 
 
देवराईची स्थापना, स्थापना, संकल्पना केंव्हा आणि कशी आली असावी याबद्द्ल अनेक मतप्रवाह आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पूर्वीच्या काळी जंगलतोड करुन ती जाळून माती सुपीक असेपर्यंत शेती केली जायची. मातीचा कस कमी झाला की जंगलाचा पुढचा पट्टा कापला जाई. अशा परिस्थितीत मूळ जंगलाचा काही भाग राखीव ठेवला जाई. त्या जंगलाचं संरक्षण करण्यासाठी झाडाखालीच वनदेवता स्थापन केली जायची. बर्‍याच देवरायांमध्ये पाण्याचे स्त्रोत असल्यामुळे शेतीला पाणी मिळायचे. देवराईच्या संरक्षणाचे नियम न पाळल्यास देवीचा कोप होतो, त्यामुळे रोगराई, नैसर्गिक संकट, पिकांचं नुकसान होऊ शकतं या भावनेमुळे लोकांनी पिढ्यानपिढ्या देवराईचं रक्षण केलं, त्याचं पावित्र्य राखलं.
 
 
देवराया असंख्य प्रकारच्या वृक्षांचं, वनस्पतीचं भांडार होत्या. आयुर्वेदात लागणार्‍या निरनिराळ्या प्रकारच्या वनस्पती तिथं उगवत. मृद आणि जल संवर्धनाचं ते भक्कम क्षेत्र होतं. पूर्वी प्रचंड प्रमाणावर वृक्षराजी होती. किंबहुना आपली गावे वस्तीच डोंगरात होती. जंगलापासून मिळणारे फायदेही भरपूर होते. देवराईत वनौषधी व इतर उपयोगी वनस्पती हमखास आढळतात. पूर्वी वैदुसाठी देवराई म्हणजे औषधाचे दुकान असायचे. आजही या देवराया आपल्याला पोटात अनेक दुर्मिळ औषधं लपवून आहेत पण त्यांना ओळखणारी  पिढी अभावानेच आढळते.
 
 
भारतात लहान मोठ्या आकाराच्या १३ हजार देवराया आहेत. एकच रचित वृक्ष किंवा देववृक्ष किंवा स्थलवृक्ष असलेल्या देवराईपासून ते शेकडो एकरावर पसरलेल्या देवराया आहेत. त्यापैकी १६०० देवराया पुणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. त्यांच्यातही काही वैशिष्ट्य आहेत. गोव्यातल्या 'मोर्शपर्ल्या' ची देवराई ही डोंगरातल्या ओढ्याचं उगमस्थान असून 'पैक' नावाच्या देवचारासाठी रक्षित आहे. मणिपूरची 'मऊहक' ही निव्वळ बांबूचं वन आहे. राजस्थात बिष्णोई लोक खेरजीच्या वनांबरोबरच काळविटांचंही रक्षण करतात. केरळात पूर्वी प्रत्येक भागात काव्यू असायचं. देवराईचे देव स्थानिक देव, भेरुजी, माताजी, आजोबा, बावसी, किंवा नाग, दुर्गा, महादेव असे हजारोंवर देव आहेत.
 
 
देवराई या संकल्पनेला विज्ञानाच्या कसोटीवर कोणतेही स्थान नाही; मात्र यातून देवाच्या नावाखाली झालेले पर्यावरणाचे  रक्षण कोणीही नाकारु शकत नाही. वन विभागासाठी लाखो - करोडो रुपये खर्च करून राखीव जंगलाच्या संरक्षणासाठी व्यवस्था केली जाते. मात्र हे डोंगरही आज वृक्षतोडीमुळे उघडे बोडके झाले आहे. या तुलनेत एक पैसाही खर्च न करता केवळ दंतकथेवर पिढ्यानपिढ्या झालेले वनराईचे रक्षण निश्चितच मनात भरते.
 
 
वैज्ञानिक महत्त्व नसेल कदाचित पण मेडिकली मात्र देवराईचे महत्त्व फार मोठे आहे. राज्यात सुमारे पाचशे ते सहाशे वर्षांपूर्वीच्या देवराया अस्तित्वात आहेत. या देवराया म्हणजे त्या परिसरातील गावांचा जिवंत दवाखाना होता. दुर्गम भागात कोठेही औषध आणि दवाखान्याची सोय नव्हती. झाडपाला, झाडांच्या मुळ्या, खोड साली हेच लोकांचे औषध होते. हे ज्ञान माणसांना अनुभवातून आले होते. म्हणूनच त्यांनी गावानजीक, टेकडीवर, पाणथळ जागेत अशी औषधी झाडांची जपणूक केली आणि यातूनच देवराया निर्माण झाल्या. आजारपण आले की लोकं देवराईत जाऊन औषधी वनस्पती आणून उपचार करत. देवराईत जांभूळ. रामेठा, पिसा,ऐन, सर्पगंधा, अश्वगंधा, अढळगंधा, हिरडा, हे़ळा, गारवळ, रानबिब्बा, भेटली माड, चांदफळ, वेत, सुरंगी, पाडळ, अशा असंख्य वनस्पती आहेत.
 
 
देवराया म्हणजे आपल्या पूर्वजांनी दिलेला लाखमोलाचा ठेवा आहे. आजही भारतीय वनौषधी शास्त्राला जगात मानले जाते. या देवराया पुढील पिढ्यांनाही संजीवनी देऊ शकतात म्हणून जंगलांबरोबरच या देवराया जपण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावेच लागतील.
 
 
आपल्याकडे पर्यावरण रक्षणासाठी  केलेलले उपाय बेगडी आणि तकलादू आहेत. पुस्तकाच्या पानावर आणि रस्त्याच्या कडेला 'वृक्ष लावा वृक्ष जगवा' अशा पाट्या लावून संदेश दिला जातो. अधिकारी, नेते भाषणात जंगलं वाचलीच पाहिजेत', असे भाषण करतात पण अवैध वृक्षतोड करण्यात टेबलाखालील आर्थिक व्यवहार करायला यांचाच पुढाकार असतो. व्हॉट ऍन आयडिया सरजी म्हणत कागद बचतीची जाहिरात करायची आणि सेल सेवेमुळे जंगलातील चिवचिवाट नाहीसा झाला आहे याचा विचारही करायचा नाही.
 
 
खरं तर देवराई हा विषय गूढ् आहे. चि. त्र्य. खानोलकर आणि जी. ए. च्या कथेइतकाच.... तरी पण या देवचाराच्या झाडांना वाचवलं नाही तर आपणही फिरत राहू, मुक्ती नसलेल्या त्या देवचारासारखे.....
 

First Published: Friday, June 29, 2012, 00:05


comments powered by Disqus