ओपनिंग विथ स्माईल... - Marathi News 24taas.com

ओपनिंग विथ स्माईल...


ऋषी देसाई
rishi.desai@zeenetwork.com
 
आज दुपारची गोष्ट..
सायन स्टेशन..
दुपारची १.५५ मिळवण्यासाठी मी प्लॅटफॉर्मवर गाडीची वाट पाहत होतो..
कानाला अर्थातचं हेडफोन, माझं आवडत गाणं - सैय्या नैनो की भाषा समझे ना..
समोर हातवारे करणारे एक यंग कॉलेज कपल..
खुपच हातवारे वाढत चालले..
तरुणीच्या डोळ्यात पाणी..
मुलाच्या डोळ्यात अंगार..
तरुणीच्या डोळ्याच्या आसवानी गालावरुन हनुवटीवर ओघळीचा स्वीकारलेला मार्ग...
दुस-या प्लॅटफॉर्मवरुन धडाडत जाणा-या ट्रेनच्या आवाजातही विचित्र धडधड..
शांतपणे हेडफोन बंद केला..
तिचं आणि त्याचं जोरात भांडण सुरु झालं होत..
रागानं त्याने तीचे मोबाईलमधले फोटो डिलीट केले, एसमेस डिलीट केलं..
कसली तरी क्षुल्लक गोष्ट प्रचंड भांडणात बदलून गेलेली..
तिची विनवणी सुरु होती..
आणि त्याच्यातली माणुसकी संपत चालली होती..
न कळता साधारणपणे दोन वर्षाचे प्रेम  दोन मिनिटात संपत चाललं होत..
ती सार काही विसरायला तयार होती फक्त तू साथ सोडू नको म्हणून  सांगत होती..
पण तो काहीही न एकता निघून गेला..
आणि ती मी तुला पुन्हा दिसणार नाही म्हणून सांगत होती..
तिनं प्रेमाच्या सा-या आणाभाका दिल्या होत्या..
पण ते एकायला तो कुठे होता..
त्य़ाचवेळी बेमुर्वत १.५५ आज वेळेत स्टेशनमध्ये घुसली..
मी ही आश्चर्य़चकीत.. आज वेळेत कशी?
पण तो प्रश्न संपेपर्यत वा-यानं आणि स्पीडने उत्तर दिल..
ती १.५५ नाहीय.. लेट झालेली १.४५ फास्ट..सीएसटी..
ओ शट्ट.. म्हणजे ती सायनला नाही थांबणार..
मी झटकन मागे फिरलो.. प्लॅटफॉर्मवर्चा जमावही मागे फिरला..
पण तो हॉर्न.. तो वाढत जाणारा आवाज.. एक क्षण काळचं फास्ट झाला होता..
पण या सा-यात कुणीतरी होत जे फास्ट होत.. त्याच्या कैकपटीन धीरगंभीर होतं....
काहीही कल्पना यायाच्या आत...
ती पुढे सरसावली..
१.४५ आणि तिच्यात फक्त निमिषाचं अंतर होत..
काहीच कळल नाही रे...
ती पुढे सरसावली..
१.४५ तर वेडीच झाली होती..
त्याच्य़ा कैकपटीने ती वेडी झाली होती..
तोडांतला आवाज संपला होता..
पापण्याच्या खाचा झाल्या ..
आणि शेवटी सालं नको तेच घडल...
तीन १.४५ आणि प्लॅटफॉर्म याचा तो कोन साधालाच..
रुळावर रक्त..
चाकांची धडधड..
आणि ट्रेनच्या पाय-यांना अडकलेली तिची गुलाबी ओढणी..
रक्ताच्या मेंदीनी सजलेली..
आणि हे सारं पाहत संपलेला.. उरलेला.. थिजलेला.. मेलेला. मी
शांतपणे पापण्या मिटत..
पुन्हा परेलच्या दिशेनं पळणारा मी...
ओपनिंग विथ स्माईलची कंमाड ऐकत जगाला सामोरे जाणारा...

First Published: Friday, December 23, 2011, 19:16


comments powered by Disqus