Last Updated: Monday, December 26, 2011, 19:07
मंदार मुकुंद पुरकरसलमान खान ४६ वर्षांचा झाला. खरंतर बॉलिवूड म्हणजे यक्ष गंधर्व लोक इथे यौवनाचं अक्षय वरदान, जरत्वाचा अभिशाप नाही आणि तसंही सलमान पन्नाशीत आला हे आपल्या मनाला पटेल का?
माझ्या पिढीला सलमान आठवतो तो राजश्रीच्या मैने प्यार किया मधला... 'दिल दिवाना बिन सजना' के माना ना या सारख्या गाण्यांनी पब्लिकला वेडं करुन सोडलं होतं राव... मराठमोळी पटवर्धनांची अल्लड निरागस भाग्यश्री, पोरसवदा दिसणारा सलमान, सूरज बडजात्याचं दिग्दर्शन आणि राम-लक्ष्मणच्या संगीताने 'मैने प्यार किया' सुपर डूपर हिट झाला होता आणि हो कबूतराला विसरुन कसं चालेल, क्लायमॅक्स सीनमध्ये व्हीलन मोहनीश बहलचा निपात करण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती. रिमा आणि सलमानचे सीन आठवून पाहा त्यातला ताजा टवटवीटपणा प्रेक्षकांना भावला होता. भाग्यश्रीने घातलेल्या पांढऱ्या एमब्रॉडरी केलेल्या ड्रेसची फॅशन त्या काळात होती. 'मैने प्यार किया'च्या यशाने एका ताऱ्याचा जन्म झाला होता. ए स्टार वॅज बॉर्न.
आज जवळपास दोन दशकांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये टॉपला राहणं हे काही येऱ्या गबाळ्याचे काम नाही. इथे प्रत्येक शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर तुमचं भवितव्य पणाला लागतं. पण गेल्या दोन वर्षात 'दबंग', 'रेडी' सारखे शंभर कोटींचा व्यवसाय करणारे सिनेमे सलमानच्या नावावर जमा आहेत.
SRK सारखा ऑरा किंवा अनिवासी भारतीयांना डोळ्यासमोर ठेऊन काढलेल्या सिनेमात सलमान कधीच दिसला नाही. तसंच यश चोप्रा किंवा यश जोहर-करण जोहरच्या कॅम्पचे पाठबळही सलमानला लाभलं नाही. आमिर खानने जबरदस्त अक्कल हुशारीचा वापर करत स्वत:ची प्रतिमा इंटलेकच्युअल असल्याचं लोकांच्या मनावर ठसवलं. मीडियानेही आमिर म्हणजे थिकिंग ऍक्टर वैगरे असल्याची इमेजची निर्मिती केली तसल्या फंदातही सलमान कधी पडला नाही.

सलमान आणि वादाचं नातं गहिरं राहिलं आहे. 'हम साथ साथ है' च्या वेळेस चिंकारा शिकारीचं प्रकरण त्याच्यावर चांगलचं शेकलं, ऐश्वर्या राय बरोबरच्या प्रेम प्रकरणातही तो हिंसक झाला होता, त्याच्या कारखाली माणसं चिरडल्याच्या प्रकरणाने त्याच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलून गेला. सलमानविषयी एक प्रकारची तिरस्काराची भावना समाजात निर्माण झाली. पण त्यावेळेस सलमानने अक्कलहुशारीचा आणि मीडियाचा परिणामकारक वापर करत आपण अडलेल्या नडलेल्यांना मदत कशी करतो त्याच्या बातम्या छापून येतील याची काळजी घेतली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण वडिलांच्या संस्कारांमुळे त्याला सामाजिक भान असावं असं आपण म्हणू शकतो. सलमानच्या दिलदारीचे अनेक किस्से चघळले जातात आणि ते खरेही आहेत. सलमानचं दातृत्वही मोठं आहे आणि त्याने खरोखरच अनेकांना सढळ हाताने मदत केली आहे.
सलमान आपल्या अनेकविध प्रेम प्रकरणांमुळेही तो सतत चर्चेत राहिला आहे. आता बिग बॉसमधल्या महक चहलच्या रिएण्ट्रीच्या मागे सलमान असल्याचा आरोप पूजा बेदीने केला आहे. पण सलमानने आजवर संगिता बिजलानी असो की सोमी अली असो किवा अगदी ऐश्वर्या राय, कतरिना कैफ यांच्यावर प्रेम भरभरून केलं. पण का कोण जाणे त्याचं रुपांतर घट्ट नातेसंबंधात होऊ शकलं नाही. मध्यंतरीच्या काळात सोनाक्षी सिन्हा त्याची लाडकी होती. कतरिनाशी विवाह बंधनात सलमान अडकेल असं वाटत असताना कुठेतरी माशी शिंकली आणि त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. सलमानला नातेसंबंधाचे वावडे आहे का? किंवा बंधनात अडकणं हे त्याच्या स्वभाव धर्माला मानवणारं नाही का अशी शंका घ्यायला वाव आहे.
सलमान हा कायम पिटातल्या पब्लिकचा लाडका हिरो राहिला. त्यामुळे मल्टिप्लेक्सच्या जमान्यातही सलमानच्या सिनेमांनी सिंगल स्क्रिन थिएटर्समध्ये तुफान धंदा केला आणि त्यांना जीवदान देण्याची मोलाची कामगिरी करुन दाखवली.
सलमानच्या माकड चाळ्यांनी वेडा होणारा प्रेक्षक आहे आणि त्याला निखळ मनोरंजनाची, चार घटका करमणुकीची गरज आहे. सलमानच्या प्रेक्षकाला सिनेमाच्या माध्यमातून आपलं कोणी बौध्दिक घ्यावं हे झेपणारं नाही. तसंच एनआरआय यांची चकचकीत जीवनशैलीत, कॉसमेटिक दु:खही त्याला आपलीशी वाटणारी नाहीत. सलमानचा प्रेक्षक वर्ग आहे समाजातील निम्न स्तरातला अति सामान्य माणूस आहे, जो रोजच्या जगण्यातल्या संघर्षाने पिचून गेला आहे. त्यामुळेच सलमानचा अगदी सामान्य वाटणारा अभिनय त्याला भावतो. सलमानमुळेच दे मार सिनेमा टिकून आहे. आणि मला वाटतं विनोद खन्नानंतर शर्ट काढून रुपेरी पडद्यावर 'छा' जाण्याची क्षमता केवळ आणि केवळ सलमानमध्येच आहे.
एकेकाळी मिथुन गरिबांचा अमिताभ होता, काही काळानंतर त्याची जागा गोविंदाने घेतली. पण गोविंदा नंतर कॉमेडीत अडकला आणि त्याला सलमानचं अपील नाही. गोविंदाचा स्वत:चा असा प्रेक्षकवर्ग आहे. आजच्या कष्टकरी वर्गाचा लाडका सुपरस्टार कोण असेल तर तो सलमान आहे.
काही वर्षानंतर सलमानचे लक्षात राहणारे सिनेमे कोणते असा जर प्रश्न विचारला तर उत्तर असेल 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन', 'तेरे नाम', 'दबंग' असे काहीच मोजके सिनेमे पण तरीही खान त्रयीतलं त्याचं स्थान अढळ आहे आणि राहिलही.
First Published: Monday, December 26, 2011, 19:07