ऑलिंपिक आणि भारत... - Marathi News 24taas.com

ऑलिंपिक आणि भारत...

अमर काणे
www.24taas.com
लंडन ऑलिंपिक आता काही दिवसांवर येऊन ठेपलंय...आणि  पुन्हा एकदा चर्चा सुरु झालीय ती भारताला ऑलिंपिकमध्ये किती मेडल्स मिळेल याची...वास्तविक भारत क्रीडापटूंपेक्षाही क्रीडाप्रेमींचा देश ओळखला जातो..लिव्हिंगरुममध्ये बसून टीव्हीवर खेळ बघायचा. एखादी क्रिकेट मॅच वा टेनिस मॅचचा बघायची. त्यावर एक्सपर्ट कॉमेन्ट देवून मोकळं व्हायच..फारतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचसाठी ऑफिस आणि शाळा बुडवायचं.त्याकरता मोठी रक्कम मोजून पहायला जाण्याची तयारी...एवढाच काय तो भारतीयांचा क्रीडाक्षेत्राशी (क्रिकेट सोडून) संबंध... प्रत्यक्षात मैदानात उतरायला आपल्यापैकी कितीजण तयार होतील याबाबत शंकाच.
 
 
हीच अनास्था आणि मैदानाबाहेर बसून मजा पहायची वृत्ती भारताच्या गेल्या 64 वर्षांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीमध्ये दिसून येते.. एक अब्ज 30 कोटी  लोकसंख्येच्या देशाला ऑलिंपिकमध्ये एक मेडल मिळेल की नाही याचीही शाश्वती नसते...ऑलिंपिकमध्ये ज्या खेळात दबदबा होता...त्या खेळात ऑलिंपिक क्वालिफाय खेळण्याची नामुष्की ओढवते...आणि क्वालिफाय केल्यानंतर तर मेडल मिळवल्याच्या रुबाब आपणं वावरत असतो. दहा, पंधरा देश खेळत असलेल्या आपल्या मातीतील खेळात वर्ल्ड चॅम्पियन होवून स्वत:चीच पाठ थोपटून घ्यायची...
 
 
भारताची मजल एखाद-दुसरा खेळ सोडला तर भारतीयांची जग जिंकण्याची किमया इतर खेळांमध्ये दिसून आलेली नाही...बीजिंग ऑलिंपिकमध्ये केलेली 3 मेडल्सची कमाई हीच काय ती भारताची आतापर्यंतच्या ऑलिंपकमधील सर्वाधिक मेडल्सची कमाई... 1976 चं मॉन्ट्रियल,1984चं लॉस एंजलिस आणि 1988चं बार्सिलोना ऑलिंपिकमध्ये तर भारताची पाटी कोरीच होती.
 
 
1928 ते  1980 हॉकी हा एकमेव खेळ भारताचं ऑलिंपिकमधील मेडल्सची (मेडलची) आशा पूर्ण करत होता, अपवाद होता तो 1952 हेलिसिंकी ऑलिंपिकमध्ये खाशाबा जाधव यांनी  कुस्तीमध्ये पटकावलेलं ब्रॉन्झ मेडल...त्यानंतर 1996 मध्ये टेनिस प्लेअर लिएंडर पेसनं अंटलांटा ऑलिंपिकमध्ये , 2000मध्ये वेलिफ्टर मल्लेश्वरीनं सिडनी ऑलिंपिमध्ये ब्राँन्झ मेडल मिळवत भारताची इभ्रत वाचवली. तर 2004मध्ये एथेन्सला राजवर्धन राठोडनं शुटिंगमध्ये सिल्व्हर मेडल पटकावताना भारताला तारलं..बीजिंगमध्ये भारताची ऑलिंपिक इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी ठरली...अभिनव बिंद्राचा शुटिंगमध्ये सुवर्णवेध...आणि बॉक्सिंगमध्ये विजेंदर आणि कुस्तीमध्ये सुशील कुमारनं जिंकलेलं ब्रॉन्झनं भारताची ऑलिंपिक इतिहासातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.
 
 
भारताची क्रीडा क्षेत्रातील ही कामगिरी 2020मध्ये जागतिक शक्ती होवू पाहणाऱ्या देशाच्या लौकीकास साजेशी नक्कीच नाही.. आता लंडन ऑलिंपिकमध्ये तरी भारतीय काही कमाल करणार का?  किमान बीजिंगपेक्षा सरस कामगिरी करण्यास यशस्वी ठरणार का? याची उत्सुकता सर्वांना आहे..
 
 
 

First Published: Tuesday, March 20, 2012, 14:10


comments powered by Disqus