राष्ट्रवादी उद्या पुन्हा फोडणार एक खासदार! - Marathi News 24taas.com

राष्ट्रवादी उद्या पुन्हा फोडणार एक खासदार!

www.24taas.com,  सांगली
एका पक्षाचा अध्यक्ष आणि खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणार असून उद्या राष्ट्रवादी राजकीय भूकंप करणार असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी आज सांगलीत केला.
 
विकास करणारा एक पक्ष हा राष्ट्रवादी आहे. त्यामुळे अनेक जण राष्ट्रवादीत येत असल्याचे पिचड यांनी सांगितले. परंतु, पिचड यांनी केवळ हिंट दिली असून त्या खासदाराचे नाव गुलदस्त्यात ठेवले आहे. या खासदार नाव कळण्यासाठी उद्या सकाळी १० वाजेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
 
राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी गौप्यस्फोट केल्यामुळे अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे. या संदर्भात अनेक खासदार आणि इतर पक्षातील असंतुष्ट अध्यक्षांच्या नावांची नावे समोर येत आहेत. यात रामदास आठवले, सुरेश शेट्टी, पांडुरंग फुंडकर यांचेही नावे पुढे येत आहेत.
 
या संदर्भात मधुकरराव पिचड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र या बाबत आणखी बोलायास नकार दिला आहे. उद्या यावरील पडदा पडणार असल्याचे पिचड यांनी सांगितले.
 
रामदास आठवले यांनी मात्र, या वृत्ताचा इन्कार केला. मी महायुतीमध्ये आनंदी आहे. त्यामुळे आता पवारांकडे जाण्याचा प्रश्नच नाही.
 

First Published: Saturday, January 28, 2012, 11:36


comments powered by Disqus