पुण्यातले 'मालामाल' उमेदवार - Marathi News 24taas.com

पुण्यातले 'मालामाल' उमेदवार

नितीन पाटोळे, www.24taas.com, पुणे
 
पुण्यातले आमदार, खासदारच नाही तर नगरसेवक आणि जिल्हा परिषद उमेदवारांची मालमत्ताही कोटींच्या घरात आहे. पुण्यातल्या सर्वांत मालामाल नगरसेवकाचा मान मिळवला तो काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दीपक मानकर यांनी. मानकरांची मालमत्ता तब्बल ३५ कोटींची आहे. त्याखालोखाल पंधरा कोटींच्या मालमत्तेसह नंबर लागला आहे तो राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचा.
 
तिसऱ्या क्रमांकावर आहेत राष्ट्रवादीच्या रेश्मा भोसले. त्यांच्याकडे १३ कोटींची संपत्ती आहे. तर आमदार पुत्र सनी निम्हण यांचा १२ कोटींच्या मालकीसह चौथा नंबर लागला आहे. या दिग्गजांबरोबरच विकास दांगट यांच्याकडे ८ कोटी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अरविंद शिंदे आणि काँग्रेस नगरसेवक शंकर पवार यांच्याकडे ४ कोटी अशी मालमत्ता जाहीर करण्यात आली आहे.
 
पुणे जिल्हा परिषदेत सगळ्यात मालामाल उमेदवार ठरलेत ते हवेली तालुक्यातले राष्ट्रवादीचे प्रदीप कंद. त्यांच्यकडे साडे चार कोटींची संपत्ती आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे नामदेव तांबे यांच्याकडे साडे तीन कोटींची मालमत्ता आहे. तर शिवसेनेच्या आशा बुचकेंकडे तब्बल ८८ तोळं सोनं आहे. आता हे कोट्यधीश उमेदवार कसं मायाजाल पसरवणार आणि मतदार लक्ष्मीपुत्रांना कसा प्रतिसाद देतात, हे लवकरच समजेल.
 
 

 
 
 

First Published: Thursday, February 2, 2012, 21:47


comments powered by Disqus