वयानं थकलेल्या वाघाची डरकाळी...
शिवसेना, शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा हे समीकरण तब्बल ४७ वर्षानंतरही कायम आहे. दसऱ्यानिमित्तानं शिवसेनेच्यावतीनं आयोजित केला जाणाऱ्या दसरा मेळाव्याचं यंदाचं ४७ वं वर्ष... आजही बाळासाहेब ठाकरेंनी शिवतीर्थावर शिवसैनिकांना दर्शन दिलं आणि संबोधितही केलं... वृद्धत्वानं थकलेल्या बाळासाहेबांना इथं प्रत्यक्षात येता आलं नसलं तरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी शिवसैनिकांशी संबोध साधला. त्यानिमित्तानं वयानं थकलेल्या एका वाघाची डरकाळी पुन्हा एकदा शिवसैनिकांनी अनुभवली.
शिवतीर्थावर येण्याची फार इच्छा होती, पण...
शिवसैनिकांना प्रत्यक्ष भेटण्याची तीव्र इच्छा होती. पण, काय करू…? माझी दुखणीच चालूच आहेत, पण कमी प्रमाणात.... हे चालूच आहे. आपल्या भेटीला यायची इच्छा असूनही शारीरिकदृष्ट्या कमकुवत झालोय. खूप इच्छा होती... यावं, भेटावं, बोलावं... पण, तुम्हाला कल्पना येणार नाही. माझी अवस्था काय आहे ती... नीट चालता येत नाही. मला बोलताना धाप लागतेय, अशा परिस्थितीत मी तुमच्याशी बोलायचं तरी काय? माझं ह्रद्य तुमच्यापाशीच आहे - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
`फटकारे`चा घ्या आस्वाद...
व्यंगचित्रांचं पुस्तक ही उद्धवचीच कल्पना. यासाठी अनेकांनी उद्धवला मदत केली. तो काळ नेहरुंचा होता, तो काळ इंदिरा गांधींचा होता... पुस्तकरुपानं ही व्यंगचित्रं तुमच्यासमोर येत आहेत त्यांचा आस्वाद घ्यावा – शिवसेनाप्रमुखांनीत केलं आवाहन
`...नाहीतर बसा बोंबलत`
‘सोनिया गांधीच्या पंचकडीनं हिंदुस्थानचं वाटोळं केलंय. त्यांना फेकून द्या हिंदूस्थानबाहेर... हिंदूस्थानच्याबाहेर... तर तर आणि तरच चांगले दिवस येतील... नाहीतर बसा बोंबलत... कसं बोंबलतात हे तरी माहित आहे ना तुम्हाला? की तेही शिकवावं लागेल?’
`शरद पवार लाज नाही का वाटतं?`
`शरद पवारांना शरम नाही का वाटतं... काय ओरडताय, मुंबई बहुभाषिक आहे म्हणून... बहूभाषिक असेल नसेल माहीत नाही मुंबई माझ्या महाराष्ट्राची राजधानी आहे हे विसरू नका... मधल्या फुल्ल्या-फुल्ल्यांमध्ये जेवढ्या शिव्या घालयच्यात तेवढ्या घाला...`
... तर शिवसैनिक कानाखाली वाजवतील
मंत्रालयाला आग लागली बरं झालं... फाईल जळाली, भानगड मिटली... मतदानाच्या वेळेला पैसे घ्यायचे मतदान करायचं आणि पुन्हा अण्णा हजारेच्या आंदोलनामध्ये सामील व्हायचं... इतकी निर्लज्ज जनता असल्यानंतर देशाला काय भवितव्य असेल... माझा शिवसैनिक पैसा देणाऱ्या – घेणाऱ्यांच्या एक सणसणीत कानाखाली वाजवतील असा माझा विश्वास आहे.
... अन् बाळासाहेबांच्या डोळ्यांत आलं पाणी
मी मैदान गाजवणारा माणूस.... पण आता थकलोय... आता पोट बिघडलंय... सर्व अवयव बिघडलेत... आता फक्त पडून असतो... असं म्हणताना बाळासाहेबांचा गहिवरला आवाज अन् वृद्धत्वानं थकलेल्या बाळासाहेबांचा स्वरानं शिवसैनिकही झाले भावूक
मला सांभाळलंत... उद्धव-आदित्यलाही सांभाळा...
मी घराणेशाही तुमच्यावर लादलं असेल, उद्धव-आदित्य यांना तुमच्यावर लादलं असेल तर विसरून जा... पण, मी त्यांना तुमच्यावर लादलेलं नाही.. तुम्ही त्यांचा स्वीकार केलेलं नाही... हे गांधी घराणं नाही... म्हणून सांगतो... मला सांभाळलंत आता उद्धवला सांभाळा... आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या – शिवसेनाप्रमुखांचं शिवसैनिकांना भावनिक आवाहन
/marathi/slideshow/माझं-हृदय-तुमच्यापाशीच-शिवसेनाप्रमुख_156.html/3