Last Updated: Thursday, March 21, 2013, 13:54
www.24taas.com, मुंबई मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशिर्वादानं आपण मोठे होत असून आपली प्रगती कुणाच्या तरी डोळ्यात खुपतेय, अशी प्रतिक्रिया मनसेचे आमदार राम कदम यांनी दिलीय. त्यामुळे राम कदम यांचा नेमका रोख कुणावर होता? असा प्रश्न अनेकांना पडलाय.
‘जर एखादा पोलीस अधिकारी आमदाराशी असा वागत असेल तर तो सामान्यांसोबत कसा वागत असेल? ४०-५० जबाबदार आमदार संतप्त का होतात? याचाही विचार व्हायला हवा. माझ्यावर माझ्या पक्षाचे संस्कार आहेत... कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यावर हात न उचलण्याचे संस्कार माझ्या पक्षानं दिलेत... माझ्यावर अन्याय झालाय’असं म्हणत राम कदम यांनी आपण सचिन सूर्यवंशी यांच्यावर हात उगारलेला नाही याचा पुनरुच्चार केलाय.
हेच बोलत असताना राम कदम यांनी ‘कमीत कमी काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशिर्वादामुळे माझी झालेली प्रगती अनेकांना खुपतेय त्यामुळेच माझ्याविरुद्ध कट-कारस्थान रचलं गेलंय...’ असा दावा केलाय. त्यामुळे हे कट-कारस्थान रचणारे लोक कोण? असा प्रश्न अनेकांना पडलाय.
एपीआय सचिन सूर्यवंशी यांना विधानभवनातच मारहाण केल्याप्रकरणी राम कदम यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर, भाजपचे जयकुमार रावल, अपक्ष प्रदीप जैयस्वाल आणि शिवसेनेचे राजन साळवी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.
First Published: Thursday, March 21, 2013, 13:46