…असा रंगला रिंगणाचा सोहळा!, first ringan sohla

…असा रंगला रिंगणाचा सोहळा!

…असा रंगला रिंगणाचा सोहळा!
www.24taas.com, झी मीडिया, सातारा

माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणाचा सोहळा मंगळवारी चांदोबाचं लिंब येथे पार पडला.

माऊलीच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण
लोणंदकरांकडून पुरणपोळीचा पाहुणाचार घेतल्यानंतर माऊलींची पालखी विविध ठिकाणी भाविकांना दर्शन देत चांदोबाचा लिंब येथे पोहोचली. चोपदारांनी रिंगण लावले. रिंगण लागल्यानंतर अश्वाला उभ्या रिंगणात सोडले... त्यापाठोपाठ स्वाराचा अश्व होता... दोन्ही अश्व रथामागील अखेरच्या दिंडीपर्यंत गेले. त्यानंतर परत फिरून माऊलींचा अश्व रथाजवळ आला. उभ्या रिंगणाचा सोहळा रंगत असताना तिकडे दिंड्यांमध्येही उत्साहाचं वातावरण होतं... अखंड माऊली नामाचा गजर सुरू होता... अनेकांनी झाडांवर बसून रिंगण सोहळा अनुभवला... रथाला अश्वांनी प्रदक्षिणा करत बेफाम दौड घेतली. अन रिंगण सोहळा पार पडला... रिंगण सोहळ्यानंतर अश्वांच्या टापाखालची धूळ कपाळी लावण्याकरता मोठ्या संख्येने वारकरी पुढे सरसावले. या रिंगण सोहळ्यानंतर माऊलींची पालखी तरडगाव मुक्कामी मार्गस्थ झाली.

तुकोबांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण

सणसर येथील मुक्काम आटोपून तुकोबारायांची पालखी बेलवडी येथे पहिल्या गोल रिंगण सोहळ्यासाठी पोहोचली. टाळ मृदुंगाचा गजर... तुकारामांचा नामघोष आणि अश्वाच्या दौडीवर खिळलेल्या वैष्णवांच्या नजरा अशा वातावरणात तुकोबांच्या पालखी सोहळ्यातलं बेलवडी येथील पहिलं गोल रिंगण पार पडलं. बेलवडीतील भाविकांनी बेलवडी फाट्यावर पालखीचे स्वागत केल्यानंतर मुख्य मार्गापासून एक किलोमीटर आत बेलवडी गावातील मैदानावर पालखी रथ नेण्यात आला. यावेळी पालखीभोवती वारकऱ्यांनी रिंगण केले आणि सुरू झाला डोळ्यांचा पारणं फेडणारा रिंगणसोहळा...

या रिंगणात सर्वप्रथम मेंढ्या धावल्या. त्यांच्यापाठोपाठ पताकावाले, तुळशी वृंदावन आणि पाण्याच्या कळशा डोक्यावर घेतलेल्या महिला वारकरी, विणेकरी, पखवाजवाले आणि टाळकरी धावले. यानंतर राजा आणि बादल या अश्वांनी तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. रिंगण पूर्ण होईपर्यंत अखंड तुकोबारायांच्या नामाचा जयघोष सुरू होता. रिंगण सोहळा आटोपल्यानंतर पालखी खांद्यावर उचलून बेलवडीतील मारूती मंदिरात नेण्यात आली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 10, 2013, 10:33


comments powered by Disqus