निषेध... गारपिटग्रस्तांची सरकारकडून क्रूर चेष्टा!, govt. started loan recovery in marathwada

निषेध... गारपिटग्रस्तांची सरकारकडून क्रूर चेष्टा!

निषेध... गारपिटग्रस्तांची सरकारकडून क्रूर चेष्टा!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

गारपिटग्रस्त शेतकऱ्यांची राज्य सरकारनं क्रूर चेष्टा केलीय. मराठवाड्यात यंदाच्या दुष्काळामुळे कर्जवसुली थांबवण्यात आली होती. ही बंदी उठवत कर्जवसुली पूर्ववत करण्याचे आदेश देणारा निर्णय राज्य शासनानं घेतलाय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे २६ तारखेपासून गारपिटीनं मराठवाड्यातला शेतकरी त्रस्त असूनही १ मार्च रोजी हा जीआर काढण्यात आलाय.

सरकारनं ही गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केल्याची भावना यामुळे निर्माण झाली असून हा आदेश तातडीनं मागे घ्यावा, अशी मागणी होतेय


मुख्यमंत्र्यांचा मंगळवारी मराठवाडा दौरा
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उद्यापासून गारपीटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. ते उद्या मराठवाड्यात दौरा करणार आहेत. तर परवा, १२ तारखेला ते विदर्भात जातील. तसंच आपण पंतप्रधानांशीही याबाबत चर्चा केल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. राज्यात ८ लाख ५० हजार हेक्टर शेतीचं गारपिटीमुळे नुकसान झाल्याचं ते म्हणाले.

गेल्या दोन आठवड्यांपासून गारपिटीनं राज्यातली जनता त्रस्त असताना नेतेमंडळी मात्र निवडणुकीच्या राजकारणात दंग आहेत, अशी टीका होतेय. अद्याप पंचनाम्यांचं काम पूर्ण झालं नसल्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळू शकलेली नाही... अखेर मुख्यमंत्र्यांना गारपिटग्रस्त भागाच्या दौऱ्याचा मुहूर्त सापडलाय. आता तरी पंचनाम्यांच्या कामाला वेग येईल आणि लवकरात लवकर मदत जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होतेय.


मदत मिळणार, निवडणूक आयोगाची परवानगी - पतंगराव कदम
गारपिटग्रस्तांना मदतीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मदत आणि पुनर्सवसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिलीये. निवडणूक आयोगानं मदतीसाठी परवानगी दिली असून मुख्यमंत्र्यांशीही याबाबत चर्चा झालीये. येत्या दोन दिवसांत कॅबिनेटची बैठक घेऊन मदत जाहीर केली जाईल, असं कदम यांनी स्पष्ट केलंय.


गारपीटग्रस्तांसाठी खडसेंची मागणी
गारपिटीच्या नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रूपये तर पशूधनाचे प्रत्येकी २५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केलीय. तसंच पीककर्ज माफ करावं, तसंच शेतकरी पाल्यांची शैक्षणिक फी माफ करावी अशी मागणीही खडसे यांनी केलीय. यासाठी केंद्राच्या निधीची वाट न पाहता सरकारने तातडीने मदत करावी असंही खडसे यांनी म्हटलंय.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 10, 2014, 20:23


comments powered by Disqus