Last Updated: Wednesday, April 10, 2013, 14:22
www.24taas.com,औरंगाबादउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानांनतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका सुरु झालीय. अनेक संघटनांनी त्याचा निषेध केलाय. हा निषेध कायम आहे. मंगळवारी औरंगाबादमध्ये अजित पवार यांच्या विरुद्ध आंदोलन करताना पवारांच्या पुतळ्याला शिवांबू पाजत जोडे मारले.
दोन दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांवर घणाघाती टीका केली. त्याच टिकेच अनुकरण शिवसैनिकांनी करत अजित पवारांच्या पुतळ्याला शिवांबू पाजत जोडे मारले आणि त्यांनी माफी मागून काही होणार नाही. अजित पवारांनी पदाचा राजीनामाच द्यावा, अशी मागणी केली.
अजित पवारांच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनात मनसेचीही पातळी घसरल्याचं समोर आलंय. दादरला सुरू असलेल्या आंदोलनात एका लहान मुलाला पकडून त्याला अजितदादांच्या पोस्टरवर लघुशंका करण्यास प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. हा मुलगा शाळेच्या युनिफॉर्ममध्ये होता.
अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांबाबतीत केलेल्या वादग्रस्त विधानाचे विधिमंडळात पडसाद उमटत असतानाच मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. महाराष्ट्राच्या विविध भागातही मनसेचे कार्यकर्ते आज आंदोलन करतील. शिवसेनेनं अजितदादांविरोधात १२ एप्रिलला एकत्र आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र त्याआधीच मनसेनं आंदोलनात आघाडी घेतलीये.
शिवसेनेनंही अजित पवारांच्या विरोधात आंदोलन सुरु केलयं. मुंबईच्या दादर आणि माहीममध्ये आंदोलन करण्यात आलं. शिवसैनिकांनी अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून त्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली.
First Published: Wednesday, April 10, 2013, 14:18