रिमांड होममधून चार अल्पवयीन मुली गायब - Marathi News 24taas.com

रिमांड होममधून चार अल्पवयीन मुली गायब

www.24taas.com, औरंगाबाद
 
औरंगाबादच्या रिमांड होममधून चार अल्पवयीन मुली गायब झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यापैकी दोन मुली सापडल्या आहेत. या मुली रिमांड होममधून पळून गेल्याचं निष्पन्न झालं आहे. १७ आणि १८ वर्ष वयाच्या या मुली आहेत. इतर दोन मुलींचा मात्र अद्यापही शोध लागलेला नाही. याआधीही असे प्रकार घडल्याचं आता समोर येत आहे.
 
गेल्या दोन वर्षात १७ मुली रिमांड होममधून पळून गेल्यात आणि त्यातली एकही मुलगी परत मिळालेली नाही. याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुली पळून गेल्याचा रिमांड होम प्रशासनाकडून दावा करण्यात आला आहे. मात्र अल्पवयीन मुली पळाल्यानं या घटनेचं गूढ अजूनही कायम आहे. सोनाली गायकवाड, मोनिका कदम, ज्योती ब्राम्हणे आणि प्रियांका भानुसे अशी या मुलींची नावं आहेत.
 
याआधीही राज्यभर गाजलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सेक्स स्कँडलमधील पीडित मुलीला याच रिमांड होममध्ये ठेवण्यात आलं होतं. तिनंदेखील तीनवेळा इथून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. आता इथून चार मुली गायब झाल्यानं रिमांड होमच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
 
 

First Published: Tuesday, January 24, 2012, 21:26


comments powered by Disqus