शिवसेनेने अभियंत्याला पाणी दाखवलं - Marathi News 24taas.com

शिवसेनेने अभियंत्याला पाणी दाखवलं

www.24taas.com, उस्मानाबाद
 
 
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना कोळेगाव धरणातून सोलापूरला पाणी सोडायला उस्मानाबादकरांनी विरोध केलाय. सोलापूरमध्ये काँग्रेस आमदार दिलीप मानेंनी केलेल्या आंदोलनानंतर  पाटबंधारे विभागानं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पाणी सोडण्यासाठी आलेल्या अभियंत्यास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पिटाळून लावले.
 
 
उजनी धरणाचं पाणी न मिळाल्यानं संतप्त झालेल्या आमदार दिलीप माने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड करत अधीक्षक आणि अभिंयत्यांना नजरकैदेत ठेवलं होतं. त्यानंतर जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर जिल्हाधिकारी आणि अधिका-यांची सुटका झाली होती. मात्र आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी सीना कोळेगाव धरणावर आलेल्या अभियंत्याला पिटाळून लावले.
 
 
उस्मानाबादचं पाणी सोलापूरला सोडणं अव्यहार्य असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं. सीना कोळेगाव धरणावर अवलंबून असणारी पिकं सोलापूरला पाणी दिल्यावर धोक्यात येणार आहेत. परिणामी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय आमदारांनी पाणी द्यायला विरोध केला आहे.

First Published: Wednesday, May 9, 2012, 14:00


comments powered by Disqus