Last Updated: Tuesday, December 11, 2012, 18:01
www.24taas.com,मुंबईदादर येथील शिवाजी पार्कचा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झालेत ती जागा सोडण्यास शिवसैनिकांनी नकार दिलाय. तसेच पालिकेत शिवतीर्थ असे नामकरण करण्यावरून जोरदार विरोध झालाय. त्यातच शिवाजी पार्कचा ताबा लष्कर घेणार आहे. त्यामुळे येथील परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.
१२ ते १७ डिसेंबर या कालावधीत विजय दिन साजरा करण्यासाठी लष्कर शिवाजी पार्क ताब्यात घेणार आहे. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानावर लष्कराची कुमक असेल. शिवाजी पार्कचा ताबा सोडण्यास शिवसेना कार्यकर्त्यांनी नकार दिलाय. अशावेळी जागता पाहारा देणाऱ्या शिवसैनिकांचे काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. लष्कराने मैदानाचा ताबा घेतल्यानंतर परिस्थिती कशी असेल, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, १२ डिसेंबरला आम्ही मैदानाचा ताबा घेणार आहोत. त्या वेळीची परिस्थिती काय असेल हे सांगू शकत नाही, असे लष्कराच्या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आलेय.
१९७१च्या युद्धात मात केल्याचा विजय दिन भारतीय सैन्य दल यंदा शिवाजी पार्कवर साजरा करणार आहे. त्यासाठी उच्च न्यायालयाकडून सप्टेंबर महिन्यातच परवानगी मिळवली आहे. दरवर्षी हा दिवस साजरा केला जात असला, तरी मुंबईकरांना सैन्य दलाबाबत अधिक माहिती व्हावी यासाठी हा दिवस मुंबईत साजरा केला जाणार आहे.
चौथऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. पालिकेने चौथरा हटविण्याची नोटीसही दिली. मात्र, नोटीशीला कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. उलट शिवाजी पार्कचे नामांतर करण्यासाठी पालिकेत प्रस्ताव आणण्याची तयारी झाली. मात्र, या प्रस्तावाला मनसेसह सर्वच विरोधाकांनी विरोध केलाय. मात्र, आपण बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव पास करण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. दरम्यान, भाजपची कोंडी झाली आहे. सेनेचा मित्र पक्ष असणाऱ्या भाजपला विश्वासात घेतले नसल्याचे भाजपचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवरून राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे.
शिवाजी पार्क न सोडण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केलाय. त्यामुळे त्यांचा क्षोभ कसा हाताळायचा, या बिकट प्रश्नामुळे राज्य सरकारने हे प्रकरण सावकाशीने हाताळण्याचे धोरण अवलंबले आहे. अशा परिस्थितीत चौथर्या्चे काय होणार, याच प्रश्नाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. विजयदिनाच्या निमित्ताने शिवाजी पार्क लष्कराच्या ताब्यात देऊन त्यांच्याच माध्यमातून स्मारक हटवले गेल्यास शिवसैनिकांचा विरोध मोडून काढता येईल, अशीही चर्चा सुरू झालीय. त्यातच सैन्य दलाचा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने राज्य सरकार निर्धास्त असल्याचे दिसत आहे.
१२ डिसेंबरला मैदानाचा ताबा घेणार आहोत. त्या वेळी परिस्थिती कशी असेल ते आताच सांगू शकत नाही. १७ डिसेंबरपर्यंत शिवाजी पार्क आमच्या ताब्यात असेल. १५ आणि १६ डिसेंबरला मुख्य कार्यक्रम पार पडेल, असे लष्करांने स्पष्ट केले आहे.
७१च्या युद्धातल्या विजयाच्या स्मृती जागवण्यासाठी 'नो युवर आर्मी' हे लष्कराचं प्रदर्शन तिथंच भरणार आहे. लष्कराची हेलिकॉप्टर्स, रणगाडे, रॉकेट लाँचर्स, अद्ययावत शस्त्रास्त्र आदी सामुग्री या प्रदर्शनात जवळून बघता येणार आहे.
First Published: Tuesday, December 11, 2012, 10:11