Last Updated: Monday, December 24, 2012, 15:37
www.24taas.com,पुणेचित्रपटाचे शुटींग संपवून मुंबईला जाताना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या टेम्पो- कारच्या अपघातात अभिनेते आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि अक्षय यांचा मुलगा प्रत्युष यांचे निधन झाले होते. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत आज सोमवारी दुपारी १२.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पुणे विद्यापीठाच्या आवारात आगामी `कोकणस्थ` चित्रपटाचे रविवारी चित्रीकरण झाले. ते संपवून रात्री नऊच्या सुमारास सर्वजण कोथरूड येथील घरी गेले. तेथून मुंबईला परतत असताना पुणे-मुंबई द्रतगती महामार्गावर बऊर पुलाजवळील ऊर्से टोल नाक्यापर्यंत आल्यानंतर, पुण्याकडे जाणारा टेंपो रस्ता दुभाजक ओलांडून विरूद्ध दिशेला जाऊन अभ्यंकर चालवित असलेल्या मोटारीवर दुभाजक तोडून जाऊन आदळला.
बऊर गावानजीक रविवारी बारा वाजण्याच्या सुमारास टेम्पो- कारचा अपघात झाला. अपघातानंतर टेंपोचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. या अपघातात अभ्यंकर, पेंडसे आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा प्रत्युष गंभीर जखमी झाले, तर पेंडसे यांची पत्नी दीप्ती तसेच अभ्यंकर यांचा मोटार चालक किरकोळ जखमी झाला.
सर्व जखमींना निगडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार चालू असतानाच अभ्यंकर, अक्षय पेंडसे व प्रत्युष या तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या दुर्घटनेमुळे मराठी रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी पुण्याकडे धाव घेतली आहे. 'झी मराठी' या टीव्ही चॅनेलवर सुरू असलेल्या 'मला सासू हवी' या मालिकेत आनंद अभ्यंकर यांनी वडिलांची तर अक्षय पेंडसे यांनी मुलाची भूमिका साकारली होती.
First Published: Monday, December 24, 2012, 08:44