Last Updated: Friday, April 12, 2013, 17:03
www.24taas.com, मुंबई बॉलिवूडमधला गाजलेला खलनायक आणि ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. ९३ वर्षीय अभिनेते प्राण यांचा भारत सरकारनंही पद्मभूषण पुरस्कारानं गौरव करण्यात आलाय.
प्राण यांनी आजवर ३५० पेक्षा अधिक चित्रपटात काम केलंय. त्यांनी खलनायकाच्या भूमिकाही नायकाच्या इतक्याच प्रमाणात उठावदार केल्या त्यामुळे त्या आजवर प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. जंजीर, डॉन, जॉनी मेरा नाम हे काही त्यांचे गाजलेले चित्रपट...
प्राण यांनी एक फोटोग्राफर म्हणून आपल्या करियरची सुरूवात केली होती. १९४० साली ‘यमला जट’ या सिनेमात त्यांना पहिल्यांदा अभिनयाची संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचं सोनं केलं. प्राण यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९२० रोजी दिल्लीमध्ये झाला होता. त्यांचे वडील लाला केवलकृष्ण सिकंद हे एक सरकारी ठेकेदार होते. रस्त्यांची आणि पुलांच्या निर्माणाची जबाबदारी त्यांच्याकडे होती.
प्राण यांनी १९६८ साली ‘उपकार’, १९७० ‘साली आँसू बन गए फूल’ तसंच १९७३ साली ‘बेईमान’ या सिनेमांसाठी सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. अभिनयासोबतच फूटबॉलचाही प्राण यांना चांगलाच नाद आहे.
First Published: Friday, April 12, 2013, 17:02